भुसावळात महसूल सप्ताहात 74 अधिकार्यांचा सन्मान
74 officials honored during Revenue Week in Bhusawal भुसावळ (3 जुलै 2025) : भुसावळ तहसील कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार नीता लबडे होत्या. कार्यक्रमात महसूल विभागातील सेवानिवृत्त तीन व कार्यरत 74 अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार प्रमाणपत्र देवून करण्यात आला.
कर्मचार्यांनी सांगितले अनुभव
यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचार्यांनी आपले अनुभव कथन करत महसूल क्षेत्रातील कार्यातील अडचणी व अनुभव शेअर केले.

तहसीलदार नीता लबडे यांनी मागील वर्षभरात (1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2025) भुसावळ तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भुसावळ तहसीलने क्रमांक 1 ची कामगिरी बजावली आहे, याचा अभिमान आहे.
उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे रात्रंदिवस आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात, यामुळे त्यांचा सन्मान व गौरव होणे आवश्यक असल्याचे विचार व्यक्त केले.
अतिक्रमण धारकांच्या प्रस्ताव सादरीकरणास सुरुवात
2 ऑगस्ट 2025 रोजी, महसूल सप्ताहाच्या दुसर्या दिवशी 2011 पूर्वीपासून शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे नियमितीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये विसावा तालुक्यातील एकूण 363 अतिक्रमित कुटुंबांचे सर्वेक्षण ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसूल अधिकार्यांनी पूर्ण करून प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर केले.
काही प्रकरणांतील दस्तऐवज अपूर्ण असल्यामुळे, तहसीलदार सौ. नीता लबडे यांनी संबंधित अधिकार्यांना प्रकरणांचा पुन्हा आढावा घेऊन लवकरात लवकर परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
महसूल सप्ताह 2025 दरम्यान नागरिकाभिमुख उपक्रम राबवले जात असून तिसर्या दिवशी नागरिकांच्या समस्यांवर विशेष सुनावणी व उपाययोजनांचा कार्यक्रम होणार आहे.
या सप्ताहाचे आयोजन जनतेसाठी सक्षम महसूल यंत्रणा या उद्दिष्टाने करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.




