भुसावळात अतिक्रमण हटविले मात्र हॉकर्स झोनचे स्थलांतरण सव्वा महिन्यानंतरही रखडले
भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ हॉकर्स बांधवांसाठी जागा देण्याचे निश्चित झाल्यानंतर या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र तब्बल महिना ते सव्वा महिना उलटूनही पालिकेने हॉकर्स बांधवांना जागा दिली नाही. परिणामी पूर्वीच्याच ठिकाणी हॉकर्स विक्रेत्यांनी हातगाड्या लावल्या आहेत. यामुळे डिस्को टॉवर ते अप्सरा चौक या मार्गावर पून्हा वाहतूकीची कोंडी होत आहे. त्यातच आता रस्त्याचे काँक्रीटीकरण केल्यानंतर रस्ता दुभाजक टाकले गेले. यामुळे पूर्वीपेक्षाही जागा कमी झाल्याने वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत.
वाल्मिक नगर ते अप्सरा चौक दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्यावरील डिस्को टॉवर ते अप्सरा चौक या मार्गावर नियोजनानुसार दुभाजक टाकण्यात आले. या कामाला हॉकर्स बांधवांनी विरोध दर्शवल्यानंतर त्यांच्या हातगाड्या गणपती मंदिराजवळील जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी घेतलेल्या बैठकीत झाला. यानुसार गणपती मंदिराजवळील अतिक्रमणही काढण्यात आले. मात्र या सर्व प्रक्रियेला साधारण सव्वा महिने होऊनही हॉकर्स बांधवांना गणपती मंदिराजवळ जागा मिळाली नाही. यामुळे त्यांनी आता पून्हा पूर्वीच्या ठिकाणी बस्तान मांडले आहे. दुभाजक टाकल्यानंतर त्यात अजून हॉकर्स बांधवांच्या हातगाड्या आल्याने रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गणपती मंदिराजवळ त्यांना जागा देणे आवश्यक आहे.

मोजमाप झाले : पुढील प्रक्रिया ठप्प
मुख्य बाजारपेठेतील अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या दरम्यान हातगाडीवरुन व्यवसाय करणार्या 70 हॉकर्स बांधवांना गणपती मंदिराजवळ जागा दिली जाणार आहे. हॉकर्स बांधवांनी 10 बाय 10 जागेची मागणी केली असून पालिकेने 6 बाय 8 फुट जागेसाठी सहमती दर्शवली आहे. मात्र ही प्रक्रिया कधी होणार? हॉकर्स बांधवांना जागा मिळून बाजारातील कोंडी कधी थांबेल? याकडे लक्ष लागून आहे.
पालिकेचा विलंब जबाबदार
मुख्य बाजारपेठ व मिरवणूक मार्गावर असलेल्या हॉकर्स बाधवांना गणपती मंदिराजवळ जागा दिली तर मुख्य बाजारपेठ अतिक्रमणमुक्त होणार आहे.मात्र पालिकेने या प्रक्रियेसाठी विलंब केला केला आहे. दुसरीकडे हॉकर्स बांधवांना व्यवसायासाठी जागा नसल्याने त्यांना पूर्वीच्याच जागेवर हातगाड्या लावाव्या लागल्या. यामुळे सध्या बाजारात निर्माण झालेल्या कोंडी व अतिक्रमणाला पालिका प्रशासनाच जबाबदार असल्याची चर्चा शहरात होऊ लागली आहे.
मोटारसायकलची अनधिकृत पार्किंग
अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या मार्गावर दुभाजक केल्यानंतर आता पश्चिमेकडील बाजूला मोटारसायकल पार्किंग केल्या जात आहेत. रस्ता काँक्रीटीकरण व हॉकर्स बांधवांना दुसरी जागा दिल्यानंतरही ही पार्किंग कायम राहिली तर उपयोग काय? या मार्गांवर कोंडी पूर्वीप्रमाणे कायमच राहिल, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. पालिकेने याबाबत गांभिर्याने अनधिकृत पार्किंग हटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
रस्ता वाहतूकीसाठी मोकळा होईल
पालिकेने गणपती मंदिराजवळ हॉकर्स बांधवांना जागा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जागेचे मोजमाप करण्यात आले. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या मार्गावर एकही अतिक्रमण किंवा अनधिकृत पार्किंग राहणार नाही, असे मुख्याधिकारी राजेंद्र फातले म्हणाले.




