भुसावळात शिंदेच्या सेनेचा इशारा अन् सेंट अलॉयसीस शाळेला मिळाली रक्षाबंधनाची सुटी


भुसावळ (8 ऑगस्ट 2025) : रक्षाबंधन सणाला शासनाकडून अन्य शाळांमध्ये सुटी दिली जात असताना भुसावळातील सेंट अलॉयसीस शाळा मात्र त्यास अपवाद होती. या सणाला सुटी नसल्याने सणाच्या दिवशी विद्यार्थी शाळेत खेड्या-पाड्यातून तसेच शहरातून येत होते. या गंभीर बाबीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील पदाधिकारी व माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी दखल घेत शाळा प्रशासनाला निवेदन दिले व सुटी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत शनिवार, 9 रोजी शाळेला सुटी जाहीर केली. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकवर्गात आनंदाची लहर पसरली आहे.

निवेदनाद्वारे दिला इशारा
दीपक धांडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश आहेत की, गणेशोत्सव किंवा नाताळ सणाला सुट्ट्या घ्यायच्या असतील तर दिवाळीच्या शेवटच्या काही सुट्ट्या कपात करून त्या घेण्यात याव्यात मात्र सेंट अलॉयसीस शाळा मोठ्या प्रमाणात साजर्‍या होणार्‍या रक्षाबंधन व पोळा यासारख्या सुट्या कपात करून त्या सुट्ट्या नाताळ सणाला घेतात विशेष म्हणजे या शाळेमध्ये शिक्षण घेणार्‍या हिंदू विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.


पोळा सणापर्यंत रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो मात्र विद्यार्थी ती राखी पोळा सणापर्यंत हातावर बांधतात तर शाळेत मात्र विद्यार्थी आल्यानंतर त्यास राखी कापण्यास सांगितले जाते व हा प्रकार भावना दुखावणारा आहे. 9 रोजी शाळेला सुटी जाहीर करावी अन्यथा शाळेसमोर आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने नरमाईचे धोरण स्वीकारत शाळेला सुटी जाहीर केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक दीपक धांडे, वैद्यकीय भुसावळ तालुकाप्रमुख योगेश वाघ, विभागप्रमुख पिंटू भोई व रोहित वराडे उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !