कृष्ण जन्म : अंधारातून दिव्य प्रकाशाचा उदय ; कथाकार श्रीकांत महाराज सराफ
अधर्मावर धर्माचा विजय ; भक्ती व श्रद्धेची शिकवण
Krishna Janma : The emergence of divine light from darkness; Storyteller Shrikant Maharaj Saraf भुसावळ (5 सप्टेंबर 2025) : शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहात शुक्रवार, 5 रोजी पाचव्या दिवसाचे पावन पर्व उत्साहात पार पडले. या दिवशी दहाव्या स्कंधातील भगवान श्रीकृष्ण जन्म यासह अनेक प्रसंगांचे रसाळ निरूपण झाले. श्रीमद् भागवत कथाकार श्रीकांत महाराज सराफ यांनी भावपूर्ण शैलीत भाविकांच्या अंत:करणाला स्पर्श करणारे विवेचन केले.
कारागृहातील काळोखात श्रीकृष्ण जन्मले आणि दिव्य प्रकाशाचा दीप पेटला – हा प्रसंग जीवनाला महत्त्वाचा संदेश देणारा आहे. संकटे कितीही गहिरी असली तरी भक्ती, श्रद्धा आणि संयम यांच्या तेजाने दैवी मार्ग प्रकाशमान होतो.

बाललीला व अद्भुत पराक्रम हे प्रसंग निरागस भक्ती आणि प्रेमाचा अखंड झरा वाहवणारे ठरले. वृंदावन विहार कथेतून माधुर्य, आनंद आणि सौंदर्याचा अनुभव भाविकांना मिळाला. तर कंसवध या प्रसंगातून अधर्म कितीही बलाढ्य असला तरी शेवटी धर्म आणि सत्याचाच विजय होतो, हा दृढ संदेश अधोरेखित झाला.
आजच्या दिवशी कथेमधून भाविकांना आशा, श्रद्धा आणि भक्तीचा नवा उगम मिळाला. अनेकांनी डोळ्यांत अश्रू तरळवत कृष्णप्रेम अनुभवले, तर काहींच्या चेहर्यावर आनंदाचे तेज झळकले.




