भाजप स्वबळावर लढणार ! : मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट सांगितले
जळगाव जिल्ह्यात आले राजकीय चर्चांना उधाण
BJP will fight on its own!: Minister Girish Mahajan made it clear जळगाव (24 ऑक्टोबर 2025) : मुंबई महापालिका वगळता राज्यात महायुतीतील पक्ष स्वबळावर लढतील, असे मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच सांगितल्यानंतर जळगावच्या पाचोर्यातही मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे. भडगावसह पाचोर्यात भाजपा स्वबळावर लढणार असल्याचा नारा त्यांनी देत कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवला आहे. पाचोरा शहरात भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या संकेतानंतर जिल्ह्यात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यात महायुती फुटल्याचे संकेत ?
मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने जळगावमध्ये महायुती फुटल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी चर्चा बंद केल्याचे कारण देत, आम्ही त्यांच्या मागे फिरायचे का? त्यांना मस्का लावायचा का? भाजप हा मजबूत पक्ष आहे, असे म्हणत महाजन यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.




किशोर पाटील यांचा ‘गद्दारी’चा आरोप
आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर ‘गद्दारी’चा आरोप करत स्वबळाचा नारा दिला होता. भाजपने आपल्याविरुद्ध निवडणूक लढवणार्या आणि विरोधातील सर्वांना पक्षात प्रवेश दिल्याचे सांगत त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती.
गिरीश महाजन यांची स्पष्ट भूमिका
किशोर पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, आम्ही भाजपमध्ये शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकार्यांना प्रवेश दिला आहे, पण मित्र पक्षातील कुणालाही घेतलेले नाही. राज्यात महायुतीतच लढायचे हे धोरण असले तरी, जिथे शक्य नाही, टोकाचे वाद आहेत, अशा काही ठिकाणी अपवादात्मक स्थितीत स्वबळावर लढावे लागेल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि भाजपामध्ये पाचोरा परिसरात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत तणाव वाढला आहे. जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे.