शालार्थ आय.डी. घोटाळ्यातील सेवानिवृत्त उपसंचालक नितीन उपासनीला बेड्या
उपसंचालक नितीन चव्हाणांच्या कार्यकाळात अपहार ः फिर्यादीच निघाला आरोपी
Shalarth ID Scam: Retired Deputy Director Nitin Upasani arrested नाशिक (5 डिसेंबर 2025) : बनावट ‘शालार्थ आय.डी.’ तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीला 3 रोजी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी उपासनीला न्यायालयाने 8 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान
बनावट शालार्थ आयडी तयार करीत शासनाची 10 कोटी नऊ लाख 53 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारदार बी.बी.चव्हाण यांचा सहभाग निष्पन्न झाला असून कारवाईच्या भीतीने ते पसार झाले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून लवकरच या प्रकरणात काहींवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
नाशिक रोड पोलिसात गुन्हा
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यासह इतर कर्मचार्यांनी संगनमत करून हा घोटाळा केल्याचे पोलीस तपासून उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस आयुक्त संदिप कर्णिक आणि पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सखोल तपासाचे आदेश दिले होते.


नितीन उपासनीला अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाने तपास करत असताना, कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे तपास करत सेवानिवृत्त उपसंचालक नितीन उपासनी यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला त्यानंतर उपासनी यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात पोलिसांना आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.







