महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ जंक्शनसह विभागातील रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त वाढवला
अतिरिक्त गाड्यांच्या पार्श्वभूमीवर आरपीएफ-जीआरपीचा बंदोबस्त : सीसीटीव्हीद्वारे संशयितांवर विशेष नजर
भुसावळ (6 डिसेंबर 2025) : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता भुसावळ जंक्शनसह विभागातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) आयुक्त चित्रेश दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ आणि जीआरपी दलांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे.
वाढत्या गर्दीवर नियंत्रणासाठी उपाययोजना
अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवल्यामुळे स्थानकांवर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षेची पातळी आणखी उंचावण्यात आली आहे. सर्व प्रवेशबिंदू, प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, प्रतीक्षालये, तिकीटघर परिसर, गाड्यांच्या मार्गांवर आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकांची कडक तपासणी सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे संशयित हालचालींवर सतत नजर ठेवली जात असून कंट्रोल रूममधून प्रत्यक्ष नियंत्रण केले जात आहे.




संशयास्पद वस्तू दिसल्यास कारवाईचे निर्देश
धावत्या गाड्यांमधील ड्युटीदल (दस्ते) देखील सक्त करण्यात आले आहेत. गाड्यांमध्ये प्रवास करणार्या आरपीएफ कर्मचार्यांना अतिरिक्त सूचना देण्यात आल्या असून कोणतीही संशयित वस्तू, कागदपत्रे किंवा हालचाल दिसताच त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
भुसावळ जंक्शनवर आरपीएफ निरीक्षक पी. आर. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानकांतर्गत आणि बाहेरील परिसरात कडेकोट गस्त ठेवण्यात येत आहे. स्थानकाच्या मुख्य व दुय्यम प्रवेशद्वारांवर तपासणी वाढवली असून प्रवाशांचे सामान, बेवारस पिशव्या व संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
अनुयायांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास त्वरित आरपीएफ किंवा जीआरपीशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे. सर्व मोठ्या स्थानकांवर सुरक्षेचा बहुपदरी आराखडा राबविल्याने महापरिनिर्वाण दिन शांततेत पार पडावा, यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.