भुसावळ शहरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ (6 डिसेंबर 2025) : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध विकास समिती, भुसावळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्टेशन जवळ येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
60 दात्यांनी केले रक्तदान
उद्घाटन मॅथ लाईफ अकॅडमीचे प्रा.जितेंद्र पाटील यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.




या शिबिरात एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणिव जपली. मानवतेच्या सेवेच्या भावनेतून विविध समाजघटकातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिरात इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रक्त केंद्र जळगाव यांच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षिततेच्या निकषांनुसार रक्तसंकलन करण्यात आले.
बौद्ध विकास समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, रक्ताला जात-धर्म नसतो रक्तदान करा या संदेशातून बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारांची प्रेरणा समाजात रुजवणे हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे.
शेवटी आयोजक समितीने सर्व रक्तदाते, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.