बहुलखेड्यात नर-मादी बिबट्याचा वावर : दोन बैलांचा पाडला फडशा

पिंजरा लावण्याची मागणी : शेतकर्‍यांमध्ये घबराट


सोयगाव (7 डिसेंबर 2025) : शेतकर्‍याच्या डोळ्यादेखत शेतात चरत असलेल्या बैलजोडीवर नर-मादी बिबट्याने हल्ला करीत बैलाला ठार केल्याची घटना शनिवार, 6 सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बहुलखेडा शिवारात घडली.

रविवार, 7 रोजी वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. शेतात डोळ्यासमोर बिबट्याची नर-मादीची जोडी पाहताच शेतकर्‍यंने घराकडे धूम ठोकली. बहुलखेडा शिवारात गेल्या आठवडाभरापासून बिबट्या जोडप्याचा वावर सुरू आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या जोडीला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.



बहुलखेडा शिवारात गट क्र-83 मधील शेतात शेतकरी किरणदास चव्हाण हे त्यांच्या शेतात चार बैलांना चरण्यासाठी सोडून उभे होते. याचवेळी शेताच्या जवळच झाडीतून नर-मादी बिबट्याच्या जोडीने शेतात शिरून चारही बैलांचा पाठलाग करून त्यातील दोन बैलांवर हल्ला करीत त्यांना ठार केले. शेतकर्‍याच्या डोळ्यासमोर ही घटना घडली.

दोन बैलांनी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून थेट घराकडे धूम ठोकली परंतु इतर दोन बैलांना बिबट्याच्या जोडीने लक्ष केले. घटनेची माहिती मिळताच वनपाल विजय कोळी, वनरक्षक शमीन तडवी,ग णेश चौधरी, संतोष जाधव, नंदू राठोड यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून शेतात पंचनामा केला.

वनरक्षक शमीन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दानिश बुखारी यांनी दोन्ही बैलांचे शवविच्छेदन केले. या परिसरात पिंजरा लावून बिबट्याच्या नर-मादी जोडीला जेरबंद करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !