सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनावरून परतणार्‍या भाविकांची कार दरीत कोसळून सहा ठार

सरकारकडून भाविकांच्या वारसांना पाच लाखांचे आर्थिक सहाय्य


नाशिक (7 डिसेंबर 2025) : सप्तश्रृंगी देवीचे दर्शनानंतर परतीच्या प्रवासात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इनोव्हा वाहन गणपती पॉईंटजवळ खोल दरीत कोसळल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला. मयत हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी आहेत.

नियंत्रण सुटल्याने अपघात
गडावर देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घराकडे परतत असताना गणपती पॉईंटजवळ कार (एम.एच.15 बी.एन.0555) मध्ये बिघाड झाल्याने वा चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतचा संरक्षक कठडा तोडून थेट हजारो फूट खोल दरीत कोसळली.



अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, गाडी ज्या ठिकाणी पडली आहे, ती दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने मदतकार्य पोहोचवण्यात आणि मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.

अपघातातील मृतांमध्ये किर्ती पटेल (50), रशिला पटेल (50), विठ्ठल पटेल (65), लता पटेल (60), पचन पटेल (60), मनी बेन पटेल (70) यांचा समावेश आहे.

भाविकांच्या वारसाना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !