अनैतिक संबंधांना विरोध करणार्या पत्नीलाच संपवले
सोलापूर (9 डिसेंबर 2025) : अनैतिक संबंधांना विरोध करणार्या पत्नीचा पतीने खून केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात घडली. सविता जकप्पा पुजारी ( 35, रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपूर) असे मृत महिलेचे तर जकप्पा मणगेरी पुजारी (रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपूर) असे अटकेतील पतीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
जकप्पा पुजारी हा ऊसतोड कामगार असून त्याचे कर्नाटकातील विजयपूर येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. काही दिवसांपूर्वी जकप्पा हा वडापूर येथील दत्तात्रय गणेशकर यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी दाखल झाला होता.


त्याच ठिकाणी दाम्पत्यामध्ये पुन्हा एकदा अनैतिक संबंधाच्या विषयावरून जोरदार भांडण झाले. वाद तीव्र होताच जकप्पा हा रागाच्या भरात गेला आणि त्याने जवळच असलेल्या कोयत्याने पत्नी सविताच्या डोक्यावर व गळ्यावर सलग प्रहार करून तिचा खून केला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उधार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, सहायक फौजदार रवींद्र चव्हाण यांसह मंद्रूप पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खून करण्यात वापरलेला कोयता जप्त केला. आरोपी जकप्पा पुजारी याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी दादागोंड महादेव कट्टीमनी (रा. सातपूर, ता. इंडी, जि. विजयपूर) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास फौजदार राजकुमार डांगे करीत आहेत.







