भुसावळकरांच्या ऐतिहासीक सेवेचे गरजूंना आयुष्यभर स्मरण


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार : नगरसेवक पिंटू कोठारींच्या दातृत्वाचे केले कौतुक

भुसावळ : कोरोनाच्या बिकट काळात महामार्गावरुन पायी जाणार्‍यांची भुसावळ शहराकडून होणारी सेवा ऐतिहासिक आहे, या सेवेचे गरजूंना आयुष्यभर स्मरण राहिल, असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे काढले. शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आल्याने ते जळगाव जात असताना त्यांनी महामार्गावरील मदत कार्याजवळ थांबून संस्थांच्या पदाधिकारी व त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या सेवेचे मुक्तकंठाने कौतुक केले. साईसेवा समितीचे तथा नगरसेवक निर्मल कोठारी यांनी शहरातून होणार्‍या मदतकार्याचा धावता आढावा दिला तर पालकमंत्र्यांनी कोठारींच्या दातृत्वासह सर्वच मदत करणार्‍या संस्थांच्या कार्याचे कौतुक केले.

महामार्गावर दिवसभर अन्नदान
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात रोजगार नसलेले कामगारांचे जथ्थे आता पायीच गावाकडे निघाले आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आदी राज्यांमधील आपल्या मुळ गावापर्यंत पायी जाणार्‍या या कामगारांच्या मदतीसाठी अनेक हात समोर आले आहेत. नगरसेवक निर्मल कोठारी व व्यापारी बांधवांनी साईसेवा समितीच्या माध्यमातून 3 एप्रिलपासून अन्नदान मोहिम निरंतर राबवली आहे. दररोज किमान 1200 ते 1500 जणांना दोन वेळेचे जेवण वितरीत केले जात आहे. यासोबतच गजराज फाऊंडेशन, मोहित नगर मित्र मंडळ, भुसावळ ग्रामीण ग्रामदानी बहुउद्देशीय संस्था आदींसह अन्य अनेक संस्था महामार्गावर नास्ता, जेवण, थंडपाणी, गरजूंना चप्पल आदींसह अन्य जीवनावश्यक व पादचार्‍यांना निकडीच्या वस्तूंचे वितरण करीत आहे.

‘निर्मल’ सेवेचे जिल्हाभरात कौतुक
शहरातील नगरसेवक तथा साई सेवा समितीचे निर्मल कोठारी यांचे मदतकार्य उल्लेखनीय आहे. भुसावळच नव्हे तर जळगावच्या दहा, 12 प्रतिष्ठीतांनी आपणास भुसावळातील नगरसेवक निर्मल कोठारींच्या सेवेबद्दल सांगितले, जिल्हाभरात त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या कार्याचा विशेष अभिमान वाटतो, असेही यावेळी पालकमंत्री यांनी सांगत कोठारींच्या कार्याचे कौतुक केले.

साईसेवा समितीची सेवा
शहरातील व्यापारी बांधवांना एकत्र करून निर्मल कोठारी यांनी साईसेवा समितीच्या माध्यमातून 3 एप्रिलपासून सलग अन्नदान सुरू ठेवले आहे. यासोबतच प्रशासनाकडून मागणी होईल ती सेवा वैयक्तीकरित्या देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भुसावळ ते लखनऊ रेल्वेतील 1300 प्रवाशांनाही त्यांनी जेवण दिले. प्रशासन सांगेल ती जबाबदारी स्विकारु, अशी भुमिकाच कोठारींनी घेतली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !