विवाहितेला अविवाहित दाखवून लावले लग्न : मालोदच्या तरुणाची अडीच लाखात फसवणूक

लग्नाच्या दुसर्‍या दिवशी नवविवाहिता पसार होण्याच्या बेतात फुटले बिंग : सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल


यावल (28 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील मालोद येथील एका 35 वर्षीय तरुणास विवाहाकरीता मुलगी देतो असे सांगत एका विवाहितेलाच नववधू आणि तिचे खोटे नातेवाईक उभे करून तरूणाचे लग्न लावण्यात आले. लग्नासाठी तरुणाकडून दोन लाख 54 हजार रुपये उकळण्यात आले मात्र संबधीत टोळक्यांच्या ठरलेल्या प्लॅननुसार लग्नाच्या दुसर्‍या दिवशी माझ्या मावस भाऊचा अपघात झाला, असा बनाव करून पसार होण्याच्या बेतात नववधूचे वागणे संशयास्पद वाटले व आरोपींचे बिंग फुटले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नववधूचे यापूर्वी देखील दोन वेळा लग्न झालेले असून तिला एक दोन वर्षाची मुलगी देखील असल्याचे समोर आले आहे.

अशी झाली फसवणूक
मालोद, ता.यावल या गावातील दिनेश शालिक पाटील (35) हा अविवाहित तरुण राहतो. समाजात नोकरी नसल्यामुळे मुलगी मिळत नाही म्हणून त्यांनी काही दलालांमार्फत लग्न जुळवले होते. या दलालांनी त्याच्याकडून लग्न जुळवणे व विवाहितेला काही दागिने आणी इतर साहित्य खरेदी करणे असा खर्च सांगून दोन लाख 54 हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर मालोद या गावात 12 जानेवारी रोजी विवाह पार पडला.

अपघाताचा बनाव अंगलट
दरम्यान, विवाहाच्या दुसर्‍याच्या दिवशी नववधू दिव्या लक्ष्मण पवार, खरे नाव कृतिका ऋतिक जावरे (रा.बादसर, ता.भडगाव) हिने सांगितले की, माझ्या मावस भावाचा अपघात झाला आहे. मला गावी तत्काळ जावे लागेल मात्र मावसभाऊ कुठे राहतो, काय करतो, कसा झाला अपघात, त्याचे नाव काय हे सांगताना मात्र तिची फजिती उडाली आणि पाटील कुटुंबाला संशय आल्याने विवाहितेला 13 जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी सखोल चौकशी करत पैसे घेऊन लग्न करून नंतर नववधू देखील तेथून पळून जायची असं हे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आणले.

या संशयीतांविरोधात गुन्हा
याप्रकरणी यावल पोलिसात शनिवार, 24 जानेवारी रोजी दिनेश शालिक पाटील यांच्या फिर्यादीवरून पुनम सुरेश भिल्ल (अडावद, ता.चोपडा), दिव्या लक्ष्मण पवार खरे नाव कृतिका ऋतिक जावरे (रा.बादशर, ता.भडगाव, हल्ली मुक्काम धुळे), मनोहर युवराज अहिरे (रा.अमरदे, ता.शिंदखेडा, जि.धुळे), बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील (रा.अजंदे, ता.शिरपूर) व एक वधूची बनावट आई, बनावट आत्या आणि बनावट आजी अशा सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे.

नववधूचे तिसरे लग्न : विवाहितेला मुलगीही
नववधू हिचे नाव कृतिका जावरे असून ती हल्ली उत्कर्ष कॉलनी, धुळे येथे राहते. तिने भडगाव तालुक्यातील बादशर येथील ऋतिक जावरे यांच्यासोबत लग्न केले होते. त्याच्यापासून तिला एक मुलगी आहे. याच ऋतिका जावरे हिने काही महिन्यापूर्वी दोधे, ता.रावेर येथील लखन गोसावी नामक तरुणाशी बनावट लग्न करून तेथून देखील ती पसार झाली होती. आता हे तिचे तिसरे लग्न असल्याचे तिने स्वतः पोलिसांकडे सांगितले.

दोधे प्रकरणात चौकशी नंतर यावलला गुन्हा दाखल.
12 जानेवारी रोजी घटना घडली होती व 13 जानेवारी रोजी यावल पोलिसात मालोद येथील पाटील कुटुंबीयांनी तिला हजर केले होते मात्र, दोधे, ता.रावेर येथील प्रकरणात या नववधूस नेल्या ुळे यावल पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !