‘रणवीर सिंग’ यांना जीवे मारण्याची धमकी देत मागितली कोट्यवधींची खंडणी
मुंबई (10 फेब्रुवारी 2026) : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांना मंगळवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सपवर पाठवलेल्या एका व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली आहे, यात आरोपीने कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
सूत्रांनुसार, धमकी मिळाल्यानंतर लगेचच मुंबई पोलिसांनी रणवीर सिंग यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे आणि ये-जा करणार्यांवर कडक नजर ठेवली जात आहे.
ही घटना चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर 31 जानेवारी रोजी झालेल्या पाच राऊंड गोळीबाराच्या घटनेनंतर घडली आहे त्यामुळे मुंबई पोलिस या प्रकरणात अधिक सतर्क आहेत.
पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये आरोपीने स्वतःला गंभीर गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे आणि मोठी रक्कम न दिल्यास परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी व्हॉइस नोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे.
मुंबई पोलिसांची सायबर सेल आणि क्राईम ब्रांच व्हॉट्सअॅप नंबर आणि व्हॉइस सॅम्पलच्या मदतीने आरोपीचे लोकेशन शोधण्यात गुंतली आहे. प्राथमिक तपासणीत, धमकी देणारी व्यक्ती एखाद्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.






