आमदार रोहित पवारांचा दावा : अजितदादांचा मृत्यू घातपातानेच !
मुंबई (10 फेब्रुवारी 2026) : अजितदादा पवारांचा मृत्यू होण्यामागे घातपात असल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी करीत खळबळ उडवून दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार यांनी सादर केले. व्हीएसआर विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त केला.
लोकांना सत्य कळावे, म्हणून पत्रकार परिषद
रोहित पवार यांनी अफवांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना एक प्रसंग सांगितला. पिंपरी चिंचवडमध्ये सिग्नलला थांबले असताना एका रिक्षाचालकाने त्यांना विचारले की, 9 तारखेला तुम्ही अजितदादांबाबत काही सांगणार होता, त्याचं काय झालं? त्यावर रोहित पवार यांनी त्याला 10 तारखेला सर्व सांगणार असल्याचे उत्तर दिले. काही लोकांनी भावनिक होऊन दादा परत येतील असे व्हिडिओ टाकले, काहींनी विमानात सहा जण होते आणि दादांचे पार्थिव सापडले नाही, असे सांगितले. या सर्व चर्चांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळेच लोकांना सत्य कळावे, म्हणून ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दादा नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत
या प्रसंगी रोहित पवार अत्यंत भावुक झाले. त्यांनी सांगितले की अपघातानंतर सलग सहा दिवस त्यांना हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखे वाटत होते. दादांचा अपघात झालाच नाही असे त्यांना सतत वाटत होते. मात्र, जेव्हा त्यांनी अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या, तेव्हा वास्तव समोर आले. जळालेला स्वेटर, चप्पल आणि अजितदादांच्या हातातील घड्याळ त्यांनी पाहिले. दादा नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत असत. त्या घड्याळात 9 वाजलेले होते आणि ते पूर्णपणे बंद पडले होते. ते दृश्य पाहून त्यांना खात्री पटली की अजितदादा आता हयात नाहीत.
दादांचा वेळ मुद्दाम वाया घालवला गेला का?
रोहित पवार यांनी दावा केला की, अपघातापूर्वी काही घडामोडींमुळे दादांचा वेळ मुद्दाम वाया घालवला गेला का, याची चौकशी व्हावी. एका नेत्याच्या फाईलमुळे उशीर झाला, पक्षातील एका नेत्याची भेट उशिरा झाली आणि त्यामुळे दुसर्या दिवशी विमान प्रवासाचा निर्णय घ्यावा लागला, यामागे काही नियोजन होते का, असा सवाल त्यांनी केला.
विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कंपनीत चेकलिस्ट पद्धत नसणे, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर बंद असणे, मेंटेनन्समध्ये त्रृटी, पायलटांवर दबाव, स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद असणे, दुसरा ‘गो अराऊंड’ न घेणे, इंधन बचतीसाठी घाई करणे अशा बाबींची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
या प्रकरणाची चौकशी केवळ स्थानिक संस्थांकडून नव्हे तर परदेशी तपास यंत्रणांकडूनही व्हावी, तसेच व्हीएसआर कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी स्पष्ट मागणी रोहित पवार यांनी केली आहे. अपघातानंतरही या कंपनीच्या विमानातून मंत्री प्रवास करतात, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी आहे, पण भारतात काहीच कारवाई का केली नाही? ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्याचा पुढे काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपासून त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबला का?
रोहित पवारांच्या प्रश्नांच्या फैरी
जे पायलट विमान उडवणार नव्हते, ते ऐनवेळी कॉकपिटमध्ये कसे आले?
विमान उडवण्यासाठी आलेल्या पायलटची ’ब्रेथ अनालायझर’ चाचणी झाली होती का?
वैमानिक ’मदन’ हे विमान उडवणार होते. मात्र, ऐनवेळी सुमित कपूर आणि शांभवी पाठक आले.
आधीचे दोन वैमानिक सकाळी साडेसहा वाजता ट्रॅफिकमध्ये अडकले होते, असे सांगितले जाते खरेच हे वैमानिक ट्रॅफिकमध्ये अडकले होते का? त्यांचे स्त्यावरील सीसीटीव्ही तपासले का?
मुख्य पायलट सुमित कपूर हे हाँगकाँगवरून आले होते. त्यांना दारूचे व्यसन होते
सुमित कपूर यांना इतर कमर्शियल फ्लाइटसमध्य दारू पिऊन विमान उडवताना पकडले होते
खासगी विमानांच्या बाबती नियम शिथिल त्यामुळे सुमित कपूर यांची तपासणी झाली नव्हती का?
सुमित कपूर यांनी नांदेडला एका नेत्याचे विमान भयानक पद्धतीने लँड केले होते. त्याची तक्रारही व्हीएसआरकडे केली होती
अजितदादा नेहमी वेळेआधी पोहोचायचे. मग त्यांचे सकाळी 7 वाजता निघणारे विमान 8.10 ला का निघाले?
अजितदादांच्या विमानाला 70 मिनिटांचा विलंब कोणामुळे झाला?, या काळात विमान किंवा वैमानिकासोबत काही घडले होते का?






