नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : नवापूरात बनावट तूप कारखान्याचा पर्दाफाश ; दिड कोटींचा मुद्देमाल जप्त
पाम तेल, वनस्पती तुपापासून गायीच्या तुपाची निर्मिती ः सुरतच्या आरोपीला बेड्या
गणेश वाघ
Major Operation by Nandurbar Crime Branch: Fake Ghee Factory Busted in Nawapur; Goods Worth ₹1.5 Crore Seized नंदुरबार (13 मार्च 2026) : नंदुरबार गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून नवापूरातील बनावट तूप कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पाम तेल, वनस्पती तुपापासून बनावट गायीचे तूप ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचे या कारवाईतून समोर आले असून तब्ब्ल दिड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आतापर्यंत आरोपींनी किती लाखांचे बनावट तूप विक्री केले ? हे अद्यापही गुलदस्त्यात असून ग्राहकांनी मात्र आता बाजारातून तूप खरेदी करताना त्याचा दर्जा तपासण्याची आवश्यकता आहे.
गोपनीय माहितीवरुन कारवाई
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना नवापूरच्या एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करून त्याची विक्री खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांना कल्पना देत गुरुवार, 12 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी व पंचांसह नवापूरातील कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान कारखाना मालक राकेशभाई ईश्वरभाई भरतीया (47, रा.सुरत, गुजरात) आढळल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.




पाम तेलापासून तूपाची निर्मिती
कारखान्यात पाम तेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ व फ्लेवर यांचा वापर करुन गायीच्या तुपासारखा रंग व वास निर्माण करुन बनावट तूप तयार केले जात असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने ओरीया कावू घी, शुभी प्रीमीयम कावू घी, लाभ कावू घी, राधेक्रिष्णा कावू घी नावाने लेबल बनवून त्याद्वारे बनावट तुप बाजारात विक्रीसाठी पाठवल्याचे स्पष्ट झाले.
दिड कोटींचा साठा जप्त
पथकाला छाप्यात पाम तेल, बनावट तूपाने भरलेले डबे, विविध क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकींग मशीन, प्रिंटींग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स, गॅस सिलिंडर, रासायनिक फ्लेव्हर आदी मिळून एक कोटी 46 लाख 56 हजार 370 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राकेशभाई ईश्वरभाई भरतियाकडे कुठल्याही प्रकारचा पामतेल व तूप बनविण्याचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या भेसळयुक्त रसायन मिश्रीत मानवी आरोग्यास हानिकारक असे पामतेल व तूप तयार केल्याने त्याच्याविरोधात विविध कलमान्वये नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, दादाभाई वाघ, विशाल नागरे, रमेश साळुंखे, सचिन वसावे, अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण आदींच्या पथकाने केली.