सावद्यात गादी भांडारला आग : तीन लाखांवर नुकसान
Fire at Mattress Store in Savda : Damage Exceeds Three Lakhs सावदा, ता.रावेर (14 मार्च 2026) : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या ‘भारत गादी भंडार’ या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत दुकानातील गाद्या तसेच इतर साहित्य जळाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काय घडले शहरात ?
सावदा शहरातील बसस्टँड परिसरात एस. के. रेडियम दुकानाच्या शेजारी असलेल्या भारत गादी भंडार या दुकानातून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी अंदाजे 1 ते 2 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नागरिकांनी तात्काळ सावदा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली.




घटनेची माहिती मिळताच सावदा नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांनी तत्परतेने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. वेळीच अग्निशामक दलाने कारवाई केल्यामुळे आग इतर दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखता आली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील मोठ्या प्रमाणावर गाद्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे दुकानदाराचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.