गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह वरणगावातील आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Accused from Varangaon nabbed by Jalgaon Crime Branch with a country-made pistol and two live cartridges भुसावळ (14 मार्च 2026) : दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगणार्या संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारातून अटक केली आहे. संजय गोपाळ चंदेले (50, रा.साईबाबा नगर, दर्यापूर, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवार, 13 मार्च 2026 रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारातील परिसरात एक इसम शस्त्रासह आल्याची माहिती मिळाली होती. पथकाने यावेळी संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर झडतीत त्याच्याकडे 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूसव आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जनमानसात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हे शस्त्र बाळगल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. नाईक श्रीकृष्ण खंडेराव देशमुख (45) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.




यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुलकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार प्रेमचंद सपकाळे, हवालदार सलीम तडवी, हवालदार उमाकांत पाटील, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, कॉन्स्टेबल छगन तायडे, कॉन्स्टेबल रतन गीते आदींच्या पथकाने केली. तपास वरणगावचे एपीआय अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल यासीन पिंजारी करत आहेत.