सौर उर्जा प्रकल्पातून कॉपर केबल चोरी करणारी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
साक्री तालुक्यातील त्रिकूटाकडून सहा लाख 97 हजारांचा मुद्देमाल जपत
Gang Stealing Copper Cables from Solar Power Project Nabbed by Dhule Crime Branch धुळे (24 मार्च 2026) : साक्री तालुक्यातील कासारे छाईल गावातील सौर उर्जा प्रकल्पातील 45 हजार रुपये किंमतीची कॉपर केबल चोरून नेण्यात आल्याची घटना 24 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपासादरम्यान धुळे गुन्हे शाखेने साक्री तालुक्यातील त्रिकूटांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांच्या पिकअप वाहनासह सहा लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेने मच्छिंद्र भटू जाधव (25) व प्रवीण रवींद्र जाधव (24, दोन्ही रा.जुनी वाडी पेरेजपूर, ता.साक्री) व सुलतान नूरा शहा (26, उर्दू शाळेजवळ, साक्री) यांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 97 हजार रुपये किंमतीची 197 किलो कॉपर केबल तसेच पाच लाख रुपये किंमतीची पिकअप (एम.एच.19 बी.एम.3268) मिळून सहा लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीन्ही आरोपींच्या अटकेने साक्री पोलिस ठाण्यातील दोन तर निजामपूर पोलिस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नामदेव सहारे, पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, तुषार सुर्यवंशी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, योगेश जगताप, अमोल जाधव, अमोल पाटील आदींच्या पथकाने केली.




