आमदार एकनाथराव खडसेंसह कन्येविरोधात फसवणुकीसह अॅट्रासिटीचा गुन्हा : समोर आले ‘हे’ कारण
Case of Fraud and Atrocities Registered Against MLA Eknathrao Khadse and His Daughter: ‘This’ Reason Comes to Light बोदवड (30 मार्च 2026) : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून त्यांचयसह कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात बोदवड पोलिसात फसवणूक व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. महार वतनाची जमीन साखर कारखाना टाकण्याच्या नावाने मुलीच्या नावावर केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
मानपूर, ता.भुसावळ येथील 82 वर्षीय तक्रारदाराने या संदर्भात बोदवड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. 2002 मध्ये मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक 122 असलेल्या जमिनीवर साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली आश्वासन देण्यात आले तसेच मूळ मालक चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना चांगला आर्थिक मोबदला देण्याचे तसेच साखर कारखान्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेदेखील आश्वासन देण्यात आले मात्र तापी पूर्णा शुगर अॅण्ड अॅलाईड इंण्डस्ट्रीज लिमिटेड नावाने बोदवड खरेदी कार्यालयात खरेदी खत तयार करण्यात आले.

मूळ खरेदी खतात खाडाखोड
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, नियोजित साखर कारखान्यासाठी दिलेल्या शेतजमिनीचा खडसे यांनी त्यांच्या राजकीय वजनाचा वापर करून 2002 ते 2005 दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालय, बोदवड येथे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून मूळ खरेदी खतात खाडाखोड करून बनावट खरेदी खत तयार करीत शासकीय दस्तावेजात हेरफेर करण्यात आला व महार वतनाची जमीन मुलगी शारदा खडसे यांच्या नावावर करण्यात आली. या कृत्यात बोदवड निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारीदेखील सहभागी असल्याने त्यांनादेखील आरोपी करण्यात आले. तपास प्रभारी उपअधीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.




