अश्विनी भिडे मुंबईच्या महापालिका आयुक्त ; तुकाराम मुंढेंसह राज्यातील दहा सनदी अधिकार्यांच्या बदल्या
Ashwini Bhide Appointed Mumbai Municipal Commissioner ; Ten IAS Officers, Including Tukaram Mundhe, Transferred Across the State मुंबई (31 मार्च 2026) : राज्यातील दहा वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली तर आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्याकडे आता ‘आपत्ती व्यवस्थापन’ या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे
1995 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली. मुंबई मेट्रो-3 प्रकल्पातील त्यांच्या कामाचा अनुभव आणि प्रशासकीय पकड पाहता, मुंबईच्या विकासकामांना गती देण्यासाठी सरकारने त्यांच्यावर हा मोठा विश्वास टाकला आहे. मुंबईच्या नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
2005 च्या बॅचचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून ‘आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन’ आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेला अवकाळी पावसाचा धुमाकूळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तींचे संकट पाहता, अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीच्या अधिकार्याची या पदावर गरज होती. मुंढे यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला येणार्या काळात होणार्या नैसर्गिक आपत्तींच्या नियोजनात मिळेल, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
लोकेश चंद्र मुख्यमंत्र्यांचे नवे अपर मुख्य सचिव
1993 च्या बॅचचे अधिकारी आणि ’महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती आता मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या जागेवर आता ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाची धुरा सांभाळतील.
अन्य अधिकार्यांच्या अशा झाल्या बदल्या
विकासचंद्र रस्तोगी (1995): अपर मुख्य सचिव (कृषी) वरून आता वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली.
विनिता वैद सिंघल (1996): प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) वरून मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती.
परिमल सिंग (2004): ’पोकरा’ प्रकल्पाचे संचालक आता कृषी विभागाचे सचिव असतील.
पृथ्वीराज बी. पी. (2014): पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आता वसई-विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.
लाहू माळी : व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई.
प्रेरणा देशभ्रतार : राज्य कर सहआयुक्त पदावरून आता मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबईपदी नियुक्ती.




