भोंदू खरातचे महिलांसोबत 3500 हून लिंक्स असलेले व्हिडिओ व्हायरल : एसआयटीने लिंक्स हटवल्या
नाशिक (1 एप्रिल 2026) : भोंदू अशोक खरातचे महिलांसोबतचे 3500 हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून विशेष तपास पथकाने या सर्व व्हिडिओच्या लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी राज्यभरात 100 हून अधिक गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमुळे पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.
भोंदू विरोधात दहा गुन्हे
भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथक त्याची कसून चौकशी करत आहे. पण अशोक खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरात व पीडित महिलांच्या व्हिडिओच्या तब्बल 3500 लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पोलिसांनी या सर्व लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत पण त्यात आणखी काही लिंक्सची भर पडत आहे.

राज्यभरात 100 हून अधिक गुन्हे दाखल
पोलिसांनी लिंक्स व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकसह कोपरगाव, बीड, अहिल्यानगर व राज्यातील इतर जिल्ह्यांत गुन्हे दाखल केलेत. हे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये सामान्य नागरिकांसह सोशल मीडियावर सक्रिय असणार्या काही विशिष्ट युजर्सचा समावेश आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ असतील त्यांच्यावरही या प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधितांनी ते व्हिडिओ किंवा लिंक्स तत्काळ डिलिट कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर अश्लील किंवा गोपनीय व्हिडिओ शेअर करणे कायद्याने गुन्हा असल्याने पीडित महिलांना त्रास होत आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अश्लील वेबसाईट्सवरही पोहोचले व्हिडिओ
अधिकार्यांच्या मते, अशोक खरातच्या व्हिडिओचा वेगाने होणारा प्रसार केवळ पीडितांच्या कुटुंबीयांना मानसिक आघातच पोहोचवत नाही, तर संभाव्य साक्षीदारांना पुढे येण्यापासून परावृत्तही करत आहे त्यामुळे तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियाच नव्हे तर अश्लील संकेतस्थळांवरही पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 23 मार्चच्या निर्देशांनंतर, प्रशासनाने अशा प्रकारच्या सामग्रीविरोधात कडक कारवाई केली आहे. या संदर्भात अनेक वृत्तवाहिन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एसआयटीच्या माहितीनुसार, हे व्हिडिओ 170 संकेतस्थळांवरून यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहेत.




