भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात पसार : पोलिसांकडून ‘लुकआऊट’ नोटीस जारी
Imposter Kharat’s Wife, Kalpana Kharat, Absconds: Police Issue ‘Lookout’ Notice नाशिक (3 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची बायको कल्पना खरात फरार झाल्यानंतर आता तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर एसआयटीने थेट माहेरी धडक देत चौकशी केल्याचे सूत्रांकडून समजते. नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक सक्रिय झाले आहे. दोन दिवस उलटूनही कल्पना सापडली नसल्याने तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली.
माहेरी केली चौकशी
एसआयटी पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पना खरातच्या माहेरी पोहोचले. येथे झालेल्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेराशी संपर्कात नाही. इतकेच नव्हे तर अशोक खरात तिला माहेरी येऊ देत नसल्याचाही आरोप आहे. लग्नानंतर कल्पनाने माहेराशी फारसा संबंध ठेवला नव्हता तसेच तिचा भाऊसुद्धा तिला भेटू शकला नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती साधी असून, ते अल्पशेतीवर उदरनिर्वाह करत असल्याची माहितीही समोर आली आहे.


नातेवाईकही रडारवर
या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचा पैलू जोडला गेला आहे. शिर्डी परिसरात जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरातने एका शेतकर्याची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भात एसआयटीने पुन्हा एकदा हर्षवर्धन खरातची चौकशी केली. तपासात असेही उघड झाले की, या व्यवहारात कल्पना आणि तिच्या भावांचा आर्थिक संबंध होता त्यामुळे आता या प्रकरणात फक्त अशोक खरातच नव्हे, तर त्याचे नातेवाईकही तपासाच्या कक्षेत आले आहेत.






