भुसावळात उद्या राष्ट्रवादी-उबाठाचा प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा
भाजपाकडून शहरविकासाला आडकाठी आणली जात असल्याचा पदाधिकार्यांचा पत्रकार परिषदेत आरोप
NCP and Shiv Sena (UBT) to hold ‘Akrosh Morcha’ at the Divisional Commissioner’s Office in Bhusawal tomorrow भुसावळ (5 एप्रिल 2026) : भुसावळ पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून विकासात अडथळे आणले जात असल्याने शहराच्या विकासावर परिणाम झाला आहे. या निषेधार्थ भुसावळातील राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उबाठा गटाकडून भाजपाच्या या कृतीविरोधात सोमवार, 6 रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकार्यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरूवात होईल व प्रांताधिकार्यांना पदाधिकारी निवेदन देतील.
भाजपाकडून शहर विकासाला विरोध
भुसावळातील शासकीय विश्रामगृहात रविवारी सकाळी 11 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकार्यांनी सांगितले की, पालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे सत्ता आली व पहिल्याच सभेत शहर विकासाचे विषय घेण्यात आल्यानंतर भाजपाने शहर विकासाच्या 177 विषयांना विरोध करीत या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे अपिल दाखल केले परिणामी या कामांना आता ब्रेक लागला आहे. शहर विकासाच्या विषयांना आडकाठी आणून शहर विकासापासून वंचित ठेवण्याचे काम भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पत्रकार परिषदेला नगरसेवक उल्हास पगारे, कामगार नेते जगन सोनवणे, दुर्गेश ठाकूर, रवी सपकाळे, सचिन पाटील, अजय पाटील, जयंत लोणारी, गणेश सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.







