भरधाव क्रुझरच्या धडकेने यावल पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा मृत्यू
Yawal Police Station Employee Killed After Being Struck by Speeding Cruiser यावल (20 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथून यावलकडे येणार्या रस्त्यावर हॉटेल मन मंदिरासमोर भरधाव क्रुझरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात यावल पोलीस ठाण्यातील कर्मचार्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भरत विठ्ठल कोळी (38) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. अत्यंत मनमिळावू कर्मचार्याचे अपघाती निधन झाल्याने यावल पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.
भरधाव क्रुझरच्या धडकेने अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, किनगाव, ता.यावल या गावातून यावल येणार्या रस्त्यावर हॉटेल मनमंदिर आहे. या हॉटेल मन मंदिरासमोरून रविवार, 9 एप्रिल रोजी रात्री यावल ठाण्यातील कर्मचारी भरत विठ्ठल कोळी (38) हे दुचाकी (एम.एच.19 सी.जी. 2813) द्वारे यावल येथून किनगावमार्गे विदगाव जात असताना भरधाव वेगातील मागून आलेली क्रुझर (क्रमांक एम. एच. 29 बी.सी. 5487) वरील चालक दीपक प्रकाश सपकाळे (रा.आडगाव) याने दुचाकीस जबर धडक दिल्याने कोळी जखमी झाले.

क्रुझर चालकाविरोधात गुन्हा
जखमी अवस्थेत त्यांना उपचाराकरिता जळगावी हलवण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात प्रवीण कोळी यांच्या फिर्यादीवरून क्रुझरवरील चालक दीपक सपकाळेविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.
विदगावात शासकीय इतमातात अंत्यसंस्कार
विदगाव, ता.यावल येथे सोमवारी दुपारी भरत कोळी यांच्या मृतदेहावर शासकिय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जळगाव डीवायएसपी नितीन गणापुरे, फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, यावल निरीक्षक रंगनाथ धारबळे, जळगाव तालुका निरीक्षक शशिकांत पाटीलसह अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयातील मानवंदना देणार्या पथकाकडून हवेत रायफलच्या फैरी झाडून सन्मान देण्यात आला.


