242 धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहास जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक

दुसरा संघ आज ठरणार : ओम भोसलेची 170 धावांची स्फोटक खेळी ठरली व्यर्थ


जळगाव (24 एप्रिल 2026) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-2026, जेसीएलटी -20 क्रिकेटच्या रविवारी होणार्‍या ग्रॅण्ड फायनल साठी पहिल्या क्वालिफायर मधून विजयी होत जळगाव कोगटा किंग च्या 242 धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटस ने थाटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा सुरू असलेल्या एलिमिनेटर सामन्यातून दुसरा क्वालिफायर साठी संघ ठरेल. दुसरी क्वालिफायर शनिवार, 25 एप्रिल दुपारी चार वाजता जैन ड्रीम स्पेसेस या भव्य क्रीडांगणावर होईल.

अमळनेर सुहांस जायंटस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव कोगटा किंग्स संघाच्या फलंदाजीनी हा निर्णय पूर्णपणे फोल ठरविला. ओम भोसले याने सुरवातीच्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत 10 उत्तुंग षटकार व 17 चौकारांच्या मदतीने 74 चेंडूंमध्ये 170 धावांची नाबाद स्फोटक खेळी खेळली. त्याच्यासोबत अक्षय मेघानी 21 धावा (16 चेंडू), जितेंद्र नाईक 20 धावा (15 चेंडू), बिपिन चांगरे 13 धावा (11 चेंडू), पुर्वेश चौधरी 8 धावा (नाबाद) यांनी योगदान दिले. निर्धारीत 20 षटकांत 3 गडींच्या मोबदल्यात 242 धावांचा विक्रमी डोंगर उभा केला. शुभम शर्मा च्या अचूक थ्रो ने जितेंद्र नाईक याला धावचीत केले. अमळनेर सुहांस जायंट संघातील केशव ठाकूर या गोलदांजाने 4 षटकांमध्ये दोन बळी घेतले. त्याच्या व्यतिरीक्त सर्व गोलंदाजांची पिटाई झाली.

धारदार प्रतिकार करत अमळनेर सुहांस जायंटसच्या फलंदाजांनी केवळ 18.3 षटकांत 3 गडी गमावत 246 धावा करुन विशाल लक्ष्य गाठले. रिषी यादव 26 (17 चेंडू), मानव ट्रिबरेवाल 29 चेंडू 6 षटकार व 4 चौकारच्या मदतीने 64 धावा करत विजयाचा पाया रचला. त्यावर रणजीत निकम व कर्णधार शुभम शर्मा यांच्या तेजतर्रार महत्त्वपूर्ण भागीदारीने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकम ने 28 चेंडूत 5 षटकार व 7 चौकार लगावत 76 धावा केल्यात. तर शुभम शर्मा ने आक्रमक खेळी करत 3 षटकार 7 चौकार खेचून केवळ 30 चेंडूत 65 धावा केल्यात. जळगाव कोगटा किंग्स चे कर्णधार जगदीश झोपे ने 2 गडी बाद केले तर 3 षटकांत 52 धावा देत राज बेलदारने 1 गडी बाद केला. रणजीत निकम याला सामनावीर म्हणून पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

पाचोरा एसकेटी योद्धाजचा पराभव
जळगाव क्रिकेट लिग चा 15 व्या लीगमधील अंतीम सामना हा गुरुवार, 23 च्या रात्री खेळविण्यात आला. अमळनेर सुहांस जायंट्सने दमदार फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर पाचोरा एसकेटी योद्धाजचा पराभव केला. 67 धावांनी मिळालेल्या विजयामुळे गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांक अमळनेर सुहांस जायंट्स पोहचला. शुभम शर्मा व अजय पाटील यांच्या तुफान खेळीने भक्कम पाया रचला. कर्णधार शुभम शर्मा याने 51 चेंडूत 69 धावा केल्यात, तर अजय पाटीलने 35 चेंडूत 69 धावा करून गोलंदाजांचे पिसे काढले. अमळनेर सुहांस जायंट्स चे 196 धावांचे आव्हान पाचोरा एसकेटी योद्धाज चा संघ पेलवू शकला नाही. सिद्धेश देशमुख (25) व सचिन चौधरी (24) यांनी थोडा प्रतिकार केला, मात्र बाकीच्या फलंदाजांना अमळनेर जायंट्सच्या गोलंदाजांच्या समोर नांगी टाकली. संपूर्ण संघ 19.4 षटकांत 129 धावांवर गारद झाला. अमळनेर सुहांस जायंट्सच्या सतिश चतुर्वेदीने अवघे 18 धावा देत 4 महत्त्वपूर्ण बळी घेऊन पाचोरा एसकेटीज योद्धाज च्या संघाला खिंडार पाडली.

मोहम्मद सैफने तीन बळी, तर गौरव ठाकूर, शुभम शर्मा, केशव ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी बाद केले. नाणेफेक वेळी यश सुनील मंत्री, सामना अधिकारी विनीत कुलकर्णी उपस्थित होते. सामानवीर म्हणून शुभम शर्मा याला गौरविण्यात आले. पारितोषीक वितरणाप्रसंगी अचीवर क्लासेसचे सचिन पटेल, प्रमोद चान्सरकर, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, काबरा, अ‍ॅड.सुरज जहाँगीर उपस्थित होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !