काँग्रेस, शरद पवार गटाचा मोदींना टोला ; दलाली खाऊ नका, भ्रष्टाचार करू नका, उधळपट्टी करू नका!


मुंबई (11 मे 2026) : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. देशाला बरबाद करण्याचा कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची. आता निवडणुका संपल्या की लगेच त्यांना त्याग आठवला. निवडणुका झाल्यामुळे त्यांना निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करू नका, असे म्हणता येणार नाही, असे या पक्षांनी म्हटले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत त्यामुळे सध्याच्या जागतिकि संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे त्यामुळे आपण स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. यावर उपाय म्हणून ज्या शहरांत मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या या आवाहनावरून केंद्र व राज्य सरकारला टोला हाणला आहे.



पंतप्रधान मोदींचे आवाहन म्हणजे दरवाढीचे संकेत
रोहित पवार म्हणाले, तेल कमी खा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, असा काटकसर करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी साहेबांनी देशाला दिला.. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत हा सल्ला योग्य असला तरी याची सुरवात केंद्र सरकारने स्वतःसह देशातील सर्व भाजपशासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल. आता भाजपाने टार्गेट ठेवलेल्या राज्यातील निवडणुका तर झाल्या आहेत त्यामुळे निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करु नका’ असे आता म्हणता येणार नाही, पण ठराविक राज्यातील बड्या कंत्राटदारांना हाताशी धरून दलाली खाऊ नका भ्रष्टाचार करु नका.. उधळपट्टी करु नका अनावश्यक वाहनांचा ताफा घेऊ नका अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करु नका हे भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला आधी सांगण्याची गरज आहे, असे केलं तर कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही.

महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळं देश अडचणीत येऊ नये यासाठी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखलं तर सरकारवर कुणी टीकाही करणार नाही आणि देशही अडचणीत येणार नाही. आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, अशीही शंका येते, असे रोहित पवार म्हणालेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !