भुसावळात 15 लाखांचे 109 हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत ; पोलिसांच्या कृतीने तक्रारदारांचे चेहरे आनंदले

पोलिसांच्या तपासाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून तोंड भरून कौतुक : अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचेही वाटप


गणेश वाघ
भुसावळ (28 मे 2026) : कधी प्रवासात तर कधी सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल चोरी होतात. महागड्या मोबाईलच्या चोरीमुळे आर्थिक नुकसानीसोबत मोबाईलमधील महत्वाचा डाटाही जात असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढते मात्र जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध तक्रारीच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या तपास करून भुसावळच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयात गुरुवार, 28 रोजी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करीत मूळ तक्रारदारांना तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 109 हरवलेले, चोरी झालेले मोबाईल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याहस्ते परत देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईलची प्रतीक्षा करणार्‍या तक्रारदारांच्या हातात पुन्हा मोबाईल येताच आनंदाने त्यांचे चेहरे उजळल्याचे दिसून आले व त्यांनी पोलिसांच्या या कृतीचे आभार मानले.

वाढते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न : जिल्हा पोलीस अधीक्षक
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले की, भुसावळ उपविभागातील गुन्ह्यांचा व्याप व पोलीस अधिकार्‍यांवर गुन्ह्यांच्या तपासाची मोठी जवाबदारी असतानाही त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना चोरी गेलेले, गहाळ झालेले मोबाईल परत मिळवून दिले, ही बाब कौतुकास्पद आहे. अधीक्षक धीवरे म्हणाले की, जिल्ह्यात वाढते अपघात ही निश्चितच चिंताजनक बाब आहे मात्र जिल्हा पोलीस प्रशासन अपघात रोखण्यासाठी विविधांगी उपाययोजना राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून पोलीस कर्मचार्‍यांना आता हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. विशेषतः अपडाऊन करणार्‍या कर्मचार्‍यांनी हेल्मेट परिधान करणे अनिवार्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्याहस्ते काही पत्रकार व पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

पोलिसांची कृती कौतुकास्पद : पत्रकार श्रीकांत सराफ
ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ म्हणाले की, मोबाईल अत्यंत महत्त्वाचे साधन असून अनेकदा मोबाईल हरवल्याचे दुःख नसते मात्र त्यातील महत्त्वाचा डाटा हरवल्याचे निश्चितपणे दुःख असते. पोलिसांनी आधूनिक उपकरणांद्वारे मोबाईल शोधून परत दिल्याने तक्रारदारांच्या चेहर्‍यावर मोठ्या प्रमाणावर आनंद पसरला आहे. उल्लेखनीय बाब म्हणून अपघात रोखण्यासाठी हेल्मेटची सुरुवात पोलिसांनी स्वतःपासून केली आहे. असंख्य कर्मचारी हेल्मेटविनाच प्रवास करतात मात्र आता हेल्मेटमुळे अपघात निश्चितपणे कमी होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक प्रशांत दरेकर, शहर निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ विभागातील दुय्यम अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.

तक्रारदारांचे उजळले चेहरे
नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 68 मोबाई, तर मुक्ताईनगर उपविभागातील मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव व सावदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 41 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. हरवलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 15.19 लाख रुपये असून, नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले.

पत्रकारांसह पोलिसांना हेल्मेट वाटप
कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश देत 45 पोलीस अंमलदार व पाच पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हेल्मेट वाटपासाठी विविध वाहन शोरूम व्यवस्थापकांनी सहकार्य केले. यामध्ये बजाज, टीव्हीएस, होंडा, सुझुकी आणि रॉयल एनफिल्ड या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. दरम्यान. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील नव्याने सुशोभित दालनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षकांच्या हस्ते झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !