रात्रीच्या अंधारात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रांवर डल्ला मारणारी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
चार गुन्ह्यांची उकल : दोन लाख 71 लाखांचा मुद्देमाल जप्त
A gang that preyed on women’s gold Mangalsutras under the cover of darkness has been nabbed by the Dhule Crime Branch. धुळे (3 जून 2026) : शहर व ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंगणात झोपलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण दोन लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चोरट्यांची चौकडी जाळ्यात : चार गुन्ह्यांची उकल
वैभव चतरू बोरसे (21, रा.नगाव, ता.धुळे), मुस्तफा जुमा पिंजारी (20, रा.नगाव, ता.धुळे), धीरज बालूसिंग गिरासे (20, रा.खलाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) व भूषण रमेश पाटील (नवे कोडदे, ता.दोंडाईचा, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या चौकशीत त्यांनी नरडाणा हद्दीतील दोन तर शिंदखेडा व धुळे तालुका हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केल्याची कबुली देत दुचाकीसह दोन लाख 71 हजारांचा मुद्देमाल काढून दिला आहे. त्यात 90 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकींसह 20 गॅ्रम सोन्याचा समावेश आहे. आरोपी वैभव व मुस्तफा याने नवलनगर, ता.धुळे येथून एक दुचाकी चोरी केली असून ती जप्त करण्यात आली आहे तर अन्य दोन दुचाकीही चोरीच्या असल्याचा संशय आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
तक्रारदार सतीश सुभाष पाटील (रा.अमराळे, ता.शिंदखेडा) यांच्या आई घराच्या अंगणात 31 मे 2026 रोजी रात्री झोपल्या असताना चोरट्यांनी पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लांबवले व याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, पोलीस अंमलदार पवन गवळी, राहुल सानप, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकूर, तुषार सूर्यवंशी, अमोल पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.



