कोळन्हावीतील 24 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू


24-year-old youth from Kolnhavi dies after being hit by an unidentified vehicle यावल (18 जून 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावीतील 24 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारार्थ आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
याबाबत यावल पोलिसात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, कोळन्हावी येथील पवन रवींद्र कोळी (24) हा गुरुवार, 18 जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावरील पाटाच्या चारीजवळ लघुशंकेसाठी थांबला होता. याचवेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन कोळी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेनंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तुषार सोनवणे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.



या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून,अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. याबाबत कोळन्हावी येथील उमेश दिलीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !