चाळीसगावात कोम्बिंगनंतर गुन्हेगारांच्या उरात धडकी : 44 सराईत आरोपी ताब्यात
39 लाखांची तीन वाहने जप्त : पकड वॉरंटमधील आठ संशयीत ताब्यात : कारवाईने उडाली खळबळ
Combing operation in Chalisgaon strikes fear into criminals ; 44 habitual offenders detained चाळीसगाव (24 जून 2026) : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चाळीसगावात नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बुधवार, 24 जून रोजी रात्री दोन ते पहाटे चारदरम्यान पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत सराईत गुन्हेगारांची तपासणी, वॉरंट बजावणी, वाहनांवर कारवाई तसेच अवैध धंद्यांविरोधात धडक मोहिम हाती घेण्यात आली.
44 संशयीत चौकशीकामी ताब्यात
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील एकूण 80 आरोपी तपासल्यानंतर गुन्हेगारांची पडताळणी करून त्यांच्या घरांची झडती घेतली. यापैकी 44 आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

तसेच आर्म अॅक्ट कलम 4/25 अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय मुंबई पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये संशयास्पद आढळलेल्या 39 लाख रुपये किमतीच्या तीन चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात व्हॅगन आर (क्रमांक एम.एच.20 ई.जे.4890), ऑडी (क्रमांक एम.एच.14 ई.पी.7358) व वरना (एम.एच.43 ए.आर.3409) या वाहनांचा समावेश आहे.
कोम्बिंगदरम्यान पोलिसांनी एकूण आठ पकड वॉरंटची बजावणी केली. तसेच प्रोहिबिशन कायद्यान्वये तीन प्रकरणांमध्ये कारवाई करून कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. याशिवाय तीन व्यक्तींना समन्स बजावण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक अमित मनेल यांच्यासह सहकार्यांनी केली.
गुन्हेगारीला पायबंद लावण्यासाठी कारवाई ः जिल्हा पोलीस अधीक्षक
चाळीसगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
