भुसावळकरांना पावसाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा : अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत
भुसावळ (26 जून 2026) : शहरातील अनेक भागात पावसाळ्यात टंचाईच्या झळा जाणत आहे त्यातच कंत्राटी कामगारांना वेतन न मिळाल्याने टँकरची सेवा बंद झाल्याने नागरिकांचे अधिकच हाल होत आहेत. तापी नदी पात्रातील बंधार्यानेही तळ गाठला असून हतनूर आवर्तनाचे पाणी पोहोचल्यानंतर परिस्थिती सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.
पालिकेच्या विहिरींनी गाठला तळ
अनेक भागात पालिकेच्या विहिरींवरुन आणलेल्या विहिरींद्वारे पाणी पाठवण्यात येत होते मात्र आता या विहिरीही आटल्याने महामार्गावरील व्यावसायिकांकडून पैसे मोजून पाणी भरावे लागत आहे. यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणार्या समाजसेवेसाठीचा खर्चही वाढला आहे. सिंधी कॉलनीतील नवजीवन सोसायटी परिसरात सोमवारी मध्यरात्री दोन वाजता पाणीपुरवठा करण्यात आला मात्र नळांना थेट गटारीचे पाणी आले. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप केला.


शहरावर तिहेरी संकट
जुनी नगरपालिका व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील विहिरींवरुन पालिकेचे व खासगी टँकर भरले जातात. मात्र या दोन्ही विहिरी आता टप्पे घेवू लागल्या आहेत. जिवंत पाण्याचा झरा असलेल्या या विहिरींमधून आता दोन, तीन टँकरही पाणी मिळत नाही. त्यातच पालिकेच्या तापी बंधार्यातील पातळी घसरली आहे. हा साठा आगामी दोन दिवसही टिकू शकणार नाही. यामुळे उचल कमी झाली आहे. हतनूरमधून आवर्तनाची मागणी करुनही धरणातच कमी साठा असल्याने आवर्तन मिळण्यास विलंब झाला शिवाय टँकरवरील कंत्राटी चालकांनी वेतन न मिळाल्याने काम बंद केले आहे.
