भुसावळातील 55 वर्षीय गॅरेज व्यावसायीकाची अज्ञातांकडून हत्या
शहरात खुनांची मालिका थांबेना : गुन्हेगारी ऐरणीवर : अज्ञाताविरोधात गुन्हा
गणेश वाघ
भुसावळ (29 जून 2026) : शहरातील आरपीडी रोडवरील मिलिटरी डेपोमागील कालिका मंदिराची स्वच्छता करणार्या 55 वर्षीय प्रौढाची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी मारहाण करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार, 29 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. संतोष रघुवीर मंचल (55, झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. मंचल हे व्यवसायाने उत्कृष्ट गॅरेज व्यावसायीक होते मात्र गेल्या पाच वर्षांपासून ते दारूच्या आहारी गेल्याने मंदिराची देखभाल व स्वच्छता करीत जीवन जगत असल्याची माहिती समोर आली.
मंदिराची देखभाल करीत गुजराण
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळातील लष्करी डेपोमागील भागात डाऊन रेल्वे लाईनजवळ भगवान शंकर व कालिका मातेचे मंदिर आहे. या मंदिराची देखभाल व स्वच्छता करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून संतोष मंचल करीत होते. मंचल हे उत्कृष्ट चारचाकी वाहन दुरुस्ती करणारे गॅरेज व्यावसायीक होते मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांनी गॅरेज व्यवसाय सोडत मंदिराची सेवा स्वीकारली. मंदिरापासून जवळच असलेल्या झेडआरटीआय भागात मंचल यांची पत्नी मंजू व मोठा मुलगा रवी व लहान मुलगा आकाश, चार मुली वास्तव्यास आहेत. मंचल मंदिरात राहत असलेतरी कुटूंबाकडून त्यांना दोन वेळचा जेवणाचा डबा आणून दिला जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
उशिराने उघडकीस आली खुनाची घटना
कालिका माता मंदिर परिसरातून रेल्वे कर्मचार्यांचे जाणे-येणे असून सोमवारी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या दरम्यान कर्मचार्यांना मंचल हे रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसताच त्यांच्या कुटूंबाला माहिती कळवण्यात आली व मोठा मुलगा रवी मंचल याने धाव घेत पाहणी केल्यानंतर खुनाचा प्रकार समोर आला. शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली.
पोलीस अधीक्षकांसह अधिकार्यांची धाव
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, शहरचे हवालदार संदीप पालवे तसेच गुन्हे शाखेसह शहर डीबी शाखेतील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पंचनाम्यानंतर मृतदेह ट्रामा सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
नशेखोरांनी हत्या केल्याचा संशय : दोन पेक्षा जास्त आरोपी
कुणाशीही वैर नसलेल्या संतोष मंचल यांची हत्या नेमकी कुणी वा कोणत्या हेतूने केली? याचे गुढ अद्यापही उलगडलेले नाही. पोलिसांनी तपासकामी पाच ते सहा संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले असून त्यांची विचारपूस सुरू आहे. विशेष म्हणजे मंचल यांना हातानेच मारहाण करण्यात आली असून त्यांच्या चेहर्याचा जबडा तोडण्यात आला तर छातीच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्याने दोन पेक्षा अधिक लोकांनी मारहाण केल्याचा संशय आहे. सोमवारी मध्यरात्री एक ते दोन दरम्यान पावसामुळे वीज गुल झाल्यानंतर ही हत्या झाल्याचा संशय आहे. या परिसरात मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर नशेखोरांचा वापर असल्याने त्यांच्याशी झालेल्या वादातून ही हत्या घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. रवी मंचल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फॉरेन्सिक तज्ज्ञ दाखल
खुनाच्या अनुषंगाने जळगाव येथून ठसे तज्ज्ञांसह फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले तर डॉग स्कॉडही दाखल झाले आहे. खून झालेला परिसर पूर्णतः जंगलाचा असल्याने शीघ्र कृती दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले असून त्यांच्याकडून परिसर पिंजून तपास सुरू करण्यात आला आहे.
