पंधरा हजारांची लाच भोवली : जळगावातील भूकर मापक एसीबीच्या जाळ्यात


जळगाव (1 जुलै 2026) : रद्द झालेली नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव शहरातील जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत भूकर मापक जितेंद्र प्रकाश पाटील (45, रा. प्लॉट क्र. १०२/१६, भूषण कॉलनी, जळगाव) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्या वडिलांचे जळगाव वडिलोपार्जित घर आहे व तक्रारदाराच्या काकांनी फेरफार करून हे घर स्वतःच्या नावे करून तक्रारदाराच्या वडिलांचे नाव कमी केल्याने त्यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपिल केले होते. अपिलानंतर नोंद रद्द करण्याचे आदेश झाले व तक्रारदाराच्या वडिलांचे नाव उताऱ्यावर लावणेकामी आदेश झाल्यानंतर 25 डिसेंबर 2025 व 5 जून 2026 रोजी कार्यालयात अर्ज करण्यात आला. तक्रार अर्जावर कारवाई न झाल्याने 18 जून 2026 रोजी जितेंद्र पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी साहेबांशी बोलून काम करून देईल, असे सांगितले मात्र तुम्हाला साहेबांसाठी दहा हजार रुपये लाच द्यावी लागेल व मला जे द्यायचे आहे ते इच्छेप्रमाणे देऊन टाका असे म्हटल्याचे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रारीत म्हटले होते.



याबाबत २५ जून रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानंतर बुधवार 1 जुलै रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी भूकर मापक जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, संगीता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ, मनोज पाटील आदींनी यशस्वी केला

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !