नाशिकमध्ये 2027 मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार : आमदार अनिल परबांचा दावा
मुंबई (3 जुलै 2026) : नाशिकमध्ये 2027 मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
कुंभमेळ्यासाठीच्या 2270 कोटींच्या टेंडरमध्ये ’रिंग’; अधिकार्यांवर गंभीर आरोप
कुंभमेळ्यासाठी एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी 2270 कोटी रुपयांची विविध रस्त्यांची टेंडर्स काढण्यात आली आहेत मात्र ही टेंडर्स मिळवण्यासाठी मुख्य अभियंता प्रशांत अवटी आणि ‘हर कन्स्ट्रक्शन’चे विलास बिरारी यांनी मिळून 16 कंपन्यांची ’रिंग’ तयार केली असल्याचा आरोप परब यांनी केला.

पात्रतेचे नियम धाब्यावर
2018 च्या सरकारी जीआरनुसार जर एखादा कंत्राटदार एका निविदेत पात्र ठरला तर त्याला दुसर्या निविदेत अपात्र ठरवता येत नाही मात्र, या अधिकार्यांनी स्वतःच्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यासाठी नियम धाब्यावर बसवले. एका निविदेत पात्र ठरलेल्या कंत्राटदाराला दुसर्या निविदेत हेतुपुरस्सर अपात्र ठरवण्यात आले, जेणेकरून पूर्वनियोजित कंत्राटदारालाच काम मिळेल, असा दावा परब यांनी कागदपत्रांचा दाखला देत केला.
एसआयटी चौकशीची मागणी
तुम्ही देवाच्या पैशांवर डल्ला मारत आहात. अजून काम पूर्णही झाले नाही आणि रस्त्यांना तडे गेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी थेट मागणी अनिल परब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली.
मुंबई महानगरपालिकेतील निधी वाटपावरून परब यांनी सरकार आणि पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले होते, त्यांना विकासकामांसाठी केवळ 25 लाख रुपये निधी देण्यात आला तर, भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना अडीच कोटींपासून ते 15 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
हा मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा आहे, तुमच्या बाप-जाद्यांचा नाही. तुम्ही या पैशांचे मालक नसून केवळ ट्रस्टी (विश्वस्त) आहात. मुंबईच्या एका वॉर्डाच्या विकासासाठी 25 लाख रुपये अपुरे आहेत. सत्तेचा एवढा दुरुपयोग करू नका, असा घणाघात त्यांनी केला. मुंबईच्या नालेसफाई आणि भ्रष्टाचाराला कंटाळून स्वतः शिंदे गटाच्या उपमहापौरांनी आयुक्तांचा राजीनामा मागितला आहे, यावरून पालिकेत काय सुरू आहे हे स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
