पीएम किसान, लाडकी बहिण योजनेचे अनुदान बंद होईल सांगणारे कॉलर सायबर फसवणूक करू शकतात : दर्शना चौधरी

भालोदला महिलांसाठी सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रम


यावल (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : पीएम किसान योजना व लाडकी बहिण योजनेचेे अनुदान बंद होईल, असे सांगत मॅसेजवर पाठवलेली लिंक उघडा, आलेला ओटीपी सांगा असे कॉल हे केवळ सायबर फसवणुक करणारे करतात, अनुदान वितरण प्रणालीकडून असे कॉल येत नाही. महिलांनी अशा कॉलपासून सावध रहावे, असे आवाहन सायबर तज्ज्ञ दर्शना चौधरी यांनी केलेे. त्या तालुक्यातील भालोद गावात महिलांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या,

जनजागृतीपर कार्यक्रम
भालोद, ता.यावल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस विभागाच्या वतीने बचत गटाच्या महिलांसाठी सायबर शिक्षा, सायबर सुरक्षा विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना पीएम किसान योजनेचे मिळणारे अनुदान बंद होईल तसेच लाडकी बहिण योजनेचेे अनुदान बंद होईल, असे सांगणारेे कॉल येतात व नंतर ते आपणास मॅसेजवर पाठवलेली लिंक उघडा, असे सांगतात, आलेला ओटीपी मांगुन ते ते तुमची सायबर फसवणूक करतात तेव्हा अशा कॉलपासून सावधान रहावे, असे प्रसंगी महिलांना सायबर सुरक्षा बाबत मार्गदर्शन करतांना विद्यापिठाच्या सायबर तज्ज्ञ दर्शना चौधरी यांनी सांगितले. या कार्यक्रमात सायबर तज्ज्ञ टिना पाटील यांची देखील उपस्थिती होती.

महिलांमध्ये जनजागृती
या दोन सायबर तज्ज्ञ विद्यार्थिनींनी महिलांना सायबर सुरक्षा म्हणजे काय, इंटरनेट व मोबाईलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली. यावेळी महिलांना सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विविध सायबर फसवणुकींची उदाहरणे देण्यात आली. यामध्ये बनावट फोन कॉल, संशयास्पद लिंक, बनावट मेसेज तसेच वैयक्तिक व बँकिंग माहिती मागणारे फोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कृतीव्दारे मार्गदर्शन
सायबर फसवणूक कशी केली जाते आणि फसवणूक करणारे लोक कोणत्या पद्धतींचा वापर करतात, हे अधिक प्रभावीपणे समजावे यासाठी विद्यार्थिनींनी हॅकरच्या मुखवट्याचा वापर करून सुमारे 5 ते 10 मिनिटांची जनजागृतीपर अ‍ॅक्टिव्हिटी घेतली. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, ऑनलाइन व्यवहार सुरक्षितपणे करणे आणि कोणत्याही संशयास्पद कॉल, लिंक किंवा मेसेजला बळी न पडणे हा होता.

सावध रहा, सुरक्षित रहा
ग्रामीण भागातील महिलांना सायबर फसवणुक करणारे सहज हेरतात,शासकिय योजना बंद होईल अशी भिती दाखवतात, पै पै जमा करून बँकेत सुरक्षीत ठेवलेली बचत ऑनलाईन ते लांबवतात तेव्हा ग्रामिण भागातील महिलांनी सावध रहा, सुरक्षित रहा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा, असे प्रसंगी मार्गदर्शन करतांना सायबर तज्ज्ञ टीना पाटील म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !