भुसावळ शहरात गोळीबार ? पोलिसांकडून दाव्याची तपासणी
Shooting in Bhusawal city? Police investigating the claim. भुसावळ (7 जुलै 2026) : शहरात गुन्हेगारी डोके वर काढले असतानाच पुन्हा गोळीबार झाल्याचा दावा एकाने केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन गोळ्या झाडल्याचा दावा एकाने केला आहे. बाजारपेठ पोलिसांनी दाव्याच्या अनुषंगाने सोमवारी रात्री घटनास्थळी जावून शहानिशा केली मात्र पोलिसांना गोळीबारानंतर घटनास्थळी आढळणारी रिकामी पुंगळी आढळली नाही तर संबंधिताच्या दाव्यानंतर पोलिसांकडून याबाबत खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
काय आहे नेमके प्रकरण ?
भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळील हनुमान मंदिराजवळ बसलेल्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळीबार केल्याचा दावा संबंधिताने करीत हा प्रकार बाजारपेठ पोलिसांना कळवला. कथित गोळीबाराची घटना सोमवार, 6 जुलै रात्री साडेनऊ ते दहा दरम्यान घडली. या गोळीबारात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. बाजारपेठ पोलीस राहुल वाघ, बाजारपेठचे चालक चंद्रशेखर गाडगीळ व सहकार्यांनी रात्री घटनास्थळी जात प्रत्यक्ष पाहणी केली.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
बाजारपेठ दाव्याच्या अनुषंगाने पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. फॉरेन्सिक पुरावे संकलित करण्याबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दाव्याच्या अनुषंगाने पडताळणी : पोलीस उपअधीक्षक
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले की, संबंधिताने गोळी झाडल्याचा दावा केला आहे मात्र रात्री पोलिसांना गोळी झाडल्यानंतरची पुंगळी आढळली नाही. मंगळवारी पुन्हा या भागाची पाहणी करू तसेच साक्षीदार व तक्रारदाराचे म्हणणे ऐकून पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल.