धुळ्यात मुलीनेच चोरले आईचे सहा लाखांचे दागिने : पोलिस तपासात बनाव उघड

जवाबातील विसंगती पश्चिम देवपूर पोलिसांनी केली उघड


Daughter steals mother’s jewelry worth ₹6 lakh in Dhule; police investigation reveals the ruse धुळे (10 जुलै 2026) : धुळे शहरातील पश्चिम देवपूर परिसरात घडलेल्या पावणे सहा लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या कथित चोरीच्या प्रकरणाचा पश्चिम देवपूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील फिर्यादी महिलेनेच स्वतःच्या घरातील सोन्याचे दागिने लपवून ठेवत चोरीचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी महिलेकडून पाच लाख 60 हजार किंमतीचे 90.30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल भास्कर बागले (58, रा. प्लॉट क्र. 7, सुंदरनगर, वलवाडी, देवपूर, धुळे) यांनी त्यांच्या राहत्या घरातून आई कस्तुरीबाई यांचे सोन्याचे मंगळसूत्र, छोटी माळ, दोन बांगड्या व पोत असा एकूण 90.30 ग्रॅम वजनाचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सहा.निरीक्षक जिजाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. घटनास्थळाची पाहणी, परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि फिर्यादीच्या कथनाची पडताळणी करताना पोलिसांना अनेक विसंगती आढळून आल्या. त्यानंतर फिर्यादीची सखोल चौकशी करण्यात आली असता तिने अखेर चोरीचा बनाव रचल्याची कबुली दिली तसेच चोरीस गेल्याचा दावा केलेले सर्व सोन्याचे दागिने स्वतःच काढून लपवून ठेवल्याचेही उघड झाले. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेकडून पाच लाख 60 हजार किंमतीचे 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. कथित घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस येत फिर्यादीच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी जिजाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सायनाथ तळेकर, पोलीस अंमलदार मनोज पाटील, मनोज साठे, मनोहर पिंपळे, किरणकुमार साळवे, सनी सरकार, सुनील राठोड, अविनाश सादरे, भाग्यश्री सोनवणे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !