शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी : एटीएम क्लोन करून लुटणारी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात
शिरपूरसह नाशिकमधील चार गुन्ह्यांची उकल : 5.23 लाखांचा मुद्देमाल जप्त
Major achievement by Shirpur City Police: Inter-state gang that looted money by cloning ATMs nabbed शिरपूर (11 जुलै 2026) : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात व्यस्त ठेवत त्यांच्याकडील एटीएम क्लोन करीत खात्यातून रक्कम लांबवणार्या आंतरराज्यीय टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत हरियाणा व उत्तर प्रदेशातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिरपूर शहर हद्दीतील दोन तर नाशिकच्या पिंपळगाव बसवंत हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल झाली.
शिरपूरात झाली होती फसवूक
शिरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून 2026 रोजी दुपारी 1.50 वाजता शिरपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेले पेन्शनर दीपक अमृत चौधरी (66) यांना तीन अनोळखी व्यक्तींनी एटीएममध्ये कॅश आहे का? असे विचारत बोलण्यात गुंतवून ठेवले. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करण्यात आली आणि त्यांच्या खात्यातून 17 हजार 300 रुपये काढून त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजने निघाला माग
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान शहरातील तसेच राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, टोलनाक्यांवरील माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. या तपासात आरोपींची कार नाशिक जिल्ह्यातील चांदवडमील स्वामी प्राईड हॉटेलबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींमध्ये अलीम रमजान मेव (32), समुन रमजान मेव (38), नासीर दिनू मेव (27, तिघे रा.घागोट, जि.पलवल, हरियाणा) व सलमान फजरुद्दीन मेव (28, चिठ्ठर, ता.बुलंदशहर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून सात हजारांची रोकड, 16 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन, एक एटीएम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेली टोयोटा ग्लान्झा कार (एच.आर.30 ए.ए.8351) असा एकूण पाच लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अशी आहे गुन्ह्याची पद्धत
अटकेतील टोळी एटीएम केंद्रात आलेल्या विशेषतः ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना मदतीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवत व त्यानंतर हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून क्लोन किंवा मूळ कार्डाच्या सहाय्याने अल्पावधीत खात्यातील रक्कम काढली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
यांनी आवळल्या टोळीच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, विनोद आखडमल, भटू साळुंखे, मनोज महाजन, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, अमोल पाटील आदींच्या पथकाने केली.
