बनावट शालार्थ आयडी प्रकरण : धुळ्यातील संस्थाचालक प्रशांत वाडीलेला अटक


Fake Shalarth ID case : Dhule-based institution head Prashant Vadile arrested धुळे (12 जुलै 2026) : राज्यात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातील संस्था चालक प्रशांत वाडीले याला शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, शालार्थ आय.डी.घोटाळ्यात तब्बल एक हजार 199 संशयीत निष्पन्न झाले आहेत.

16 प्रमुख संशयीतांविरोधात प्रबळ पुरावे
एसआयटीने नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल 11 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून घोटाळ्यात आतापर्यंत एक हजार 199 संशयित निष्पन्न झाले आहेत. शासनाची सुमारे 160 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून मार्च 2026 मध्ये नाशिकरोड पोलिसांत दाखल गुन्ह्यामध्ये 16 प्रमुख संशयितांविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात आले. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील 233 शाळांमधील 821 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचे तपासात समोर आले आहे.

शुक्रवारी धुळ्यात पथक दाखल
शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवणार्‍या या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या अनुषंगाने आठ सदस्यीय पथक शुक्रवारी रात्रीच धुळ्यात दाखल झाल्याची माहिती आहे. देवपूर पोलिसांची मदत घेवून पथकाने गोंदूर रोड स्थित प्रशांत वाडीलेच्या घराची झडती घेतली. कारवाईदरम्यान शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित बनावट कागदपत्रांचा शोध घेण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपीला नाशिकला हलवले
शनिवारी सकाळपासूनच झडती आणि पंचनामा प्रक्रिया राबवण्यात आली. कारवाईसाठी देवपूर पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाडीले याला पुढील चौकशीसाठी नाशिक येथे हलविण्यात आले. दरम्यान, प्रशांत वाडीले हे विविध शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले. ली होती.

संस्था चालक आता रडारवर
बोगस शालार्थ आय.डी.प्रकरणात धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल 894 शिक्षक तसेच तीन उपसंचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय काही संस्थाचालक आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !