भरधाव मालवाहू वाहन कारवर धडकले : अपघातानंतर वाहनाच्या आगीत सहा जणांचा मृत्यू


वर्धा (सोमवार, 20 जुलै 2026) : नागपूरकडे जाणार्‍या कारला मागून भरधाव येणार्‍या मालवाहू आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्यनतर झालेल्या अपघातात कारने पेट घेतला व आगीत कारमधील चार जणांचा जळून मृत्यू झाला तर धडक देणार्‍या मालवाहू वाहनातील दोन व्यक्तीचांही मृत्यू झाला. हा भीषण अपघात समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडला.

वर्ध्यातील एकाच कुटुंबावर काळाचा घाला
या भीषण अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आयशर ट्रकचा चालक संजय कुमार (30, उत्तर प्रदेश), वाहक समरजित पाल (24, उत्तर प्रदेश) यांच्यासह कारमधील जानवी राजेश टिपले (21), सुषमा राजेश टिपले, राजेश आनंदराव टिपले आणि अंकुश राऊत (सर्व रा. सालोड हिरापूर, जि. वर्धा) यांचा समावेश आहे. अपघातानंतर सर्व मृतदेह महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने वर्धा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले

इथेनॉल टँकर उलटल्याने झाला होता गोंधळ
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघाताचे मूळ कारण काल रात्री घडलेल्या एका दुसर्‍या घटनेत आहे. याच मार्गावर रात्रीच्या सुमारास इथेनॉल वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला होता त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून महामार्गाची एक बाजू बंद करून दुसर्‍या बाजूने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. याच एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू असताना, पहाटेच्या सुमारास विरूळ गावाजवळ एका मालवाहू वाहनाच्या चालकाचे स्वतःच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. हे अनियंत्रित वाहन थेट समोरून चाललेल्या कारवर जाऊन जोरदार आदळले आणि त्यानंतर हा मृत्यूचा तांडव घडला.

प्रवाशांना जीव वाचवण्याची मिळाली नाही संधी
अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की, मागून धडक बसताच कारच्या इंजिनने तत्काळ पेट घेतला. काही क्षणांतच संपूर्ण कारला आगीने वेढा घातला. कारचे दरवाजे लॉक झाल्यामुळे किंवा प्रवाशी बेशुद्ध पडल्यामुळे त्यांना गाडीतून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवण्याची साधी संधीही मिळाली नाही. बघता-बघता चारही जणांचा आगीत अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या अपघातात मरण पावलेले सर्व प्रवासी हे प्राथमिक माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातीलच रहिवासी असल्याचे समोर येत आहे. पोलीस सध्या त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

मृतांची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आव्हान
आग इतकी भयंकर होती की, कारमधील मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली आह त्यामुळे मृतांची अचूक ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आरटीओ विभागाच्या मदतीने कारच्या नंबर प्लेटवरून आणि चेसिस नंबरवरून गाडीच्या मालकाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !