शिरपूरात शिक्षकाचे अपहरण करीत तीन लाखांची खंडणी उकळली : दोघे आरोपी जाळ्यात

शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी : दोन लाख 91 हजार 500 रुपयांची रोकड जप्त


शिरपूर (सोमवार, 20 जुलै 2026) : मूळच्या युपीतील मात्र व्यवसायानिमित्त शिरपूरात राहणार्‍या एका शिक्षकाचे अपहरण करीत त्यास मारहाण करीत तीन लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. शिरपूर शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आरोपींना निष्पन्न करीत दोघांच्या मुसक्या बांधण्यात यंत्रणेला यश आले.

काय आहे प्रकरण ?
मूळचे मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असलेले प्रांशु नवीनकुमार वर्मा (30) हे व्यवसायाने शिक्षक असून शिरपूरच्या जयलक्ष्मी मॉलजवळ संचेती कॉम्प्लेक्समध्ये राहतात. सोमवार, 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.30 ते रात्री 9.15 वाजेच्या सुमारास संशयीत पवन हटकर व वैभव सूर्यवंशी (सोनवणे) यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने मोटारसायकलवर बसवत तपनभाई पटेल मार्गावरील एका खोलीत नेत बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन दोन वेगवेगळ्या क्यूआर कोडद्वारे तब्बल तीन लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेण्यात आले होते. ऑनलाईन रक्कम जमा झाल्यानंतर आरोपींनी त्यांचा तिसरा साथीदार बंटी उर्फ हर्षल मनोहर बोरसे याला ती रक्कम रोख स्वरूपात आणण्यास सांगितले होते.

दोन आरोपींना अटक : एक संशयीत पसार
शिंगावे शिवारातील पटेल मोटार कार सर्व्हिसिंग सेंटरजवळ आरोपी येणार असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पवन शंकर हटकर (22, रा.जनता नगर, शिरपूर) व वैभव रामेश्वर सोनवणे (25, रा.मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी साथीदार बंटी उर्फ हर्षल मनोहर बोरसे हा पसार असल्याचे सांगण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 91 हजार 500 रुपयांची रोकड व पाच हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, एपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश भांड, अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरीफ तडवी, प्रशांत पवार, सोमा ठाकरे, निलेश चौधरी आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !