अवैध शस्त्रनिर्मिती बनवणार्‍या उमर्टीवर आघात : भल्या पहाटे कोम्बिंग ; 12 संशयीत ताब्यात, गावठी कट्टे व काडतूसही जप्त

जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई ः महाराष्ट्र पासिंगच्या 32 मोटारसायकली जप्त


Crackdown on illegal arms manufacturing in Umarti: Early morning combing operation; 12 suspects detained, country-made pistols and cartridges seized. जळगाव (मंगळवार, 21 जुलै 2026) : राज्याच्या काना-कोपर्‍यातील गुन्हेगारांना अवैधरित्या गावठी कट्टे सप्लाय करण्यासाठी कुख्यात असलेल्या मध्यप्रदेशातील उमर्टीत मंगळवारी पहाटे तीन जिल्ह्यांच्या पोलिसांनी ऑपरेशन कोम्बिंग राबवले. शेकडो पोलिसांचा ताफा अधिकार्‍यांच्या नेतृत्वात गावात शिरताच सर्वत्र पळापळ झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, दोन कट्टे, चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पासिंगच्या तब्बल 32 दुचाकी आढळल्याने त्या डिटेन करीत जप्त करण्यात आल्या. यावेळी 45 घरांची झडती घेवून 20 संशयीतांची सखोल चौकशी करण्यात आली तर 12 संशयीतांना यंत्रणेने ताब्यात घेतले. प्रथमच मोठ्या प्रमाणावर झालेल्या आघाताने अवैध शस्त्र बनवणार्‍यांच्या गोटात थरकाप उडाला.

मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ‘उमर्टी’
अवैधरित्या कट्टा विक्रीसाठी राज्यात कुख्यात असलेल्या उमर्टी एकाचवेळी जळगाव पोलिसांसह नाशिक ग्रामीण व धुळे पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोर्चा वळवला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस ठाणे, चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे तसेच नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर शस्त्र अधिनियमातील गुन्ह्यांतील फरार आणि सराईत आरोपींच्या शोधासाठी मंगळवारी पहाटे 2 ते सकाळी 8 या वेळेत मध्यप्रदेशातील पार उमरटी परिसरात व्यापक स्वरूपात ही कारवाई करण्यात आली.

यांचा अधिकार्‍यांचा सहभाग
या विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बावळे (मालेगाव), जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, अमळनेर उपअधीक्षक विनायक कोते, भुसावळ उपअधीक्षक केदार बारबोले, चोपडा विभागाचे सुनील पाटील, शिरपूर उपविभागाचे सुधीर पाटील आदी सहभागी झाले.

धुळे गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर वारे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, मालेगावच्या पवारवाडी ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ, चोपडा शहरचे निरीक्षक पवन देसले, चोपडा ग्रामीण निरीक्षक संजय सोनवणे, रामानंद निरीक्षक मधुकर साळवे, जिविशाच्या कावेरी कमलाकर, धुळे नियंत्रण कक्षाचे राजू सुर्वे यांच्यासह जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिस दलातील 400 हून अधिक अधिकारी-कर्मचारी कोम्बिंगमध्ये सहभागी झाले.

कट्ट्यांसाठी लागणारा कच्चा माल व कट्टे जप्त
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतुसे, 32 संशयित मोटारसायकली तसेच देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, साचे आणि अन्य साहित्य जप्त केले. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 27 फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले. यावेळी 12 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले.

या धडक कारवाईमुळे जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात केला असून फरार आरोपींना अटक करण्यास आणि संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्ह्यातील अवैध शस्त्रास्त्रे, संघटित गुन्हेगारी आणि फरार आरोपींविरुद्ध अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहतील. नागरिकांनी संशयास्पद हालचाली, गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !