‘महाराष्ट्र बंद’ला भुसावळात संमिश्र प्रतिसाद : केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध : शहरातील बाजारपेठेत बंदचे आवाहन
भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : दिल्लीतील जंतरमंतर येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला गुरुवार, 23 जुलै रोजी भुसावळ शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील विविध भागात बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
पदाधिकार्यांनी केले आवाहन
गुरुवारी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य बाजारपेठेतून फेरी काढत व्यापार्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवून व्यापार्यांनी या बंदला संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले.
मोदी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी
यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत वातावरण ढवळून काढले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध असो, लोकशाही वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनाही या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन सरकारने संवेदनशीलतेने हाताळण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग अवलंबल्याचा आरोप वंचित आघाडीच्या नेत्यांनी केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. केवळ एका मंत्र्याला वाचवण्यासाठी लोकशाही मूल्यांचे खच्चीकरण होत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. या ‘महाराष्ट्र बंद’ला समविचारी संघटना व विविध पक्षांनी पाठिंबा दर्शवला. समता सैनिक दल, मध्य रेल्वेतील ऑल इंडिया एसएसटी युनियन आदी संघटनांनी सक्रिय सहभाग घेत आंदोलनाला बळ दिले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात बाळा पवार, बाळा मोरे, सुधीर जंजाळे, शांताराम जाधव, रुपेश साळुंखे, गणेश सोनवणे, जितेंद्र लोखंडे, सुरेश यशोदे, संगीत खरे, समता सैनिक दलाचे युवराज नरवाडे, होकर्स युनियनचे राजू सपकाळे, पल्लवी गुरचळ, मनीषा जाधव, वर्षा सपकाळे, प्रवीण मोरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त राखला.



