शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : साडेसात लाखांचा 150 किलो गांजा जप्त
जुनापाणी परिसरातील दुर्गम वनजमिनीवर कपाशी पिकाआड फुलवला गांजा : एका आरोपीला अटक
शिरपूर (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : शिरपूर तालुक्यातील जुनापाणी परिसरातील वनविभागाच्या जमिनीवरील अतिदुर्गम भागात कपाशीआड फुलवलेल्या गांजावर शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल 150 किलो वजनाची हिरवी, ओली गांजाची झाडे जप्त करण्यात आली. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सात लाख 50 हजार रुपये आहे. या प्रकरणी विकास नकाराम पावरा यास अटक करण्यात आली तर दुसरा संशयीत राजाराम नकाराम पावरा (रा.जुनापाणी, ता.शिरपूर, जि.धुळे) हा पसार होण्यात यशस्वी झाला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना बुधवार, 19 ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत जुनापाणी परिसरातील दुर्गम भागात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी यांनी कपाशीच्या पिकामध्ये आंतरपीक असल्याचे भासवून प्रतिबंधित कॅनाबिस वनस्पतीची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याचे स्पष्ट होताच छापा कारवाईसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली. त्यानंतर शासकीय पंच, वजनकाटा धारक, छायाचित्रकार आणि पोलिस पथकासह बुधवारी दुपारी सुमारे 2.30 वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांना पाहताच राजाराम पावरा पसार झाला तर विकास नकाराम पावरा याला ताब्यात घेण्यात आले.
150 किलो गांजाची झाडे जप्त
छापा कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे 3 ते 5 फूट उंचीची, मुळांसह हिरवी व ताजी गांजाची झाडे, पाने, फुले आणि फांद्या असा एकूण 150 किलो कॅनाबिस वनस्पतीचा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालाची प्रतिकिलो पाच हजार रुपये दराने एकूण किंमत 7 लाख 50 हजार रुपये आहे. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्यासह संतोष पाटील, संदीप ठाकरे, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे, संजय भोई, सुनील पवार, दिनकर पवार, धनराज गोपाळ, मनोज नेरकर, अल्ताफ मिर्झा आणि इसरार फारुकी यांच्यासह पोलिस पथकाने केली.


