थाळनेर पोलिसांची मोठी कारवाई : दुर्गम भागातील गांजा शेती उद्ध्वस्त : 93.50 लाखांचा 374 किलो गांजा जप्त

जमाईपाडा परिसरातील वनजमिनीवर फुलवली गांजा शेती : पोलीस येताच संशयीत पसार


धुळे (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : थाळनेर पोलिसांनी अतिदुर्गम भागात मोठी कारवाई करत बेकायदेशीररीत्या लागवड करण्यात आलेला तब्बल 374 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 93 लाख 50 हजार रुपये असून या प्रकरणात संशयीतांविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपीने वनविभागाच्या जमिनीवर गांजाशेती फुलवली मात्र पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना अतिदुर्गम जमाईपाडा परिसरातील वनविभागाच्या जमिनीवर गांजाशेती करण्यात आलयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कल्पना देत शासकीय पंचांसोबत छापेमारी केली. यावेळी संशयीत रवींद्र खुमसिंग पावरा (रा.महादेव, ता.शिरपूर) हा पथक येताच पसार झाला.




374 किलो गांजा जप्त
कारवाईदरम्यान गांजाची हिरवीगार झाडे, पाने, बोंडे व फांद्या असा एकूण 374 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 93 लाख 50 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 99/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(अ)(ळ) आणि 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील, पोलीस अंमलदार चतरसिंग खसावद, उमाकांत वाघ, विजय पाटील, अनिकेत साळुंखे, विनोद पावरा, रवींद्र कोकणी, चालक आकाश साळुंखे, केशव जाधव, कैलास महाजन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार देवेंद्र ठाकूर, गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली.

पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
या कारवाईमुळे दुर्गम भागात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीविरोधात पोलिसांनी मोठा दणका दिल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकातून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !