रावेर-यावलमध्ये कृत्रिम पावसासाठी आमदार अमोल जावळेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे


रावेर (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची उभी पिके वाचविण्यासाठी ‘कृत्रिम पाऊस’ पाडण्याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अनियमित पावसाने शेतकरी संकटात
यंदा रावेरसह यावल तालुक्यासह परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित राहिल्याने शेतकर्‍यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्याने केळी, कापूस, मका, सोयाबीन यांसह विविध पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी उभी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. तसेच भूजल पातळी खालावत असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.

तांत्रिक पर्यायांचा विचार करणे गरजेचे
या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची उभी पिके वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपलब्ध तांत्रिक पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह लगतच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या शक्यतेचा तातडीने अभ्यास करून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार अमोलजावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली

शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही आमदार जावळे यांनी व्यक्त केली आहे. या उपाययोजनेमुळे पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळून उभी पिके वाचविण्यास मदत होऊ शकते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !