धुळ्यात 12 हजारांची लाच घेताना तलाठ्यासह खाजगी पंटर जाळ्यात
दुसरा ग्राममहसुल अधिकारी पसार : तहसील आवारात यशस्वी झाला सापळा
धुळे (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : गौण खनिज वाहतूक करू देण्यासह गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 12 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना मोहाडी, ता.धुळे येथील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे (40) व खाजगी पंटर जयेश कैलास चौधरी (31) यांना धुळे एसीबीने पकडल्याने महसूल वर्तुळातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. लाच प्रकरणात ग्राममहसूल अधिकारी तथा बाळापूर तलाठी मृणाल शरद नगराळे याचादेखील सहभाग आढळला असून त्यासही आरोपी करण्यात आले आहे. तलाठी दाभाडे याच्याकडे फागणे, ता.धुळे येथील अतिरीक्त कारभार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचा बांधकाम मटेरीयल वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकिचे हायवा वाहन चालकासह धुळ्यातील साक्री रोडवरील मोती नाल्यापुढे थांबले असताना तलाठी दाभाडे, नगराळे व गायकवाड यांनी वाहन चालकाकडून मोबाईल क्रमांक घेत धुळ्यातील चाळीसगाव चौफुलीवर भेटण्यास बोलावले. तक्रारदाराने दाभाडे व गायकवाड यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासह वाहतूक सुरळीत चालू देण्यासाठी 20 हजारांची लाच मागितल्याने तक्रारदाराने घाबरून लागलीच आठ हजार रुपये दिले व 7 रोजी धुळे एसीबीकडे घडला प्रकार सांगत तक्रार नोंदवली.

तहसील आवारातून आरोपींना अटक
धुळ्यातील तहसील कार्यालयाच्या मंगळवारी दुपारी संशयीत जयेश चौधरीने लाचेची रक्कम स्वीकारत तलाठी दाभाडे यांच्याकडे दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली तर संशयीत शरद नगराळेचा शोध सुरू करण्यात आला आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, एएसआय राजन कदम, हवालदार मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

