गणिताचा पाया समजून घ्या, गणित सोपे होईल : डॉ. चंद्रमौली जोशी
भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘समजून घेऊया गणित’ या विषयावर कार्यशाळा
भुसावळ (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : गणित हा विषय मुळातच सोपा आहे मात्र आपण त्याचा अनावश्यक बाऊ करून घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती निर्माण झाली आहे. गणिताचा पाया समजून घेतला तर हा विषय निश्चितच सोपा होतो, असे प्रतिपादन रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रमौली जोशी यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे चेअरमन सुनील वानखेडे, संस्थेचे सचिव पी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक राखी बढे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान क्षेत्राचा पाया गणित
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चंद्रमौली जोशी म्हणाले की, विज्ञान क्षेत्राचा पाया गणित आहे. गणित केवळ परीक्षेपुरते न शिकता जीवनासाठी शिकणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक टप्प्यावर गणिताचा संबंध येतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध स्वरूपात आपण गणिताचा वापर करीत असतो त्यामुळे गणिताची भीती न बाळगता त्याच्याशी मैत्री करा. गणितातील न उलगडणारी कोडी सोडवायची असतील तर त्याच्या मुळाशी म्हणजेच पायापर्यंत पोहोचा. त्यामुळे गणित निश्चितच सोपे वाटेल. यावेळी त्यांनी विविध गणिती क्लृप्त्यांचा वापर करून अवघड वाटणारे गणित सहज आणि सोप्या पद्धतीने कसे सोडविता येते, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. बारावीनंतरच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त आणि अचूक उदाहरणे सोडविण्याची आवश्यकता असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच गणिताशी मैत्री करावी, असे आवाहन त्यांनी केले.सुनील वानखेडे यांनी रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. शहरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रम व स्पर्धांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे स्वरूप समजते आणि त्या स्पर्धांमध्ये टिकून राहण्याची क्षमता निर्माण होते. यासाठी रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
तर विषयाबद्दलही निर्माण होईल आवड
संस्थेचे सचिव पी.व्ही.पाटील म्हणाले की, अभ्यासक्रमासोबतच विषय समजून घेण्यासाठी विविध क्लृप्त्या व कृतींचा वापर केला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक वृद्धिंगत होते आणि विषयाबद्दलची आवडही निर्माण होते.च
प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी शिकले गणित
कार्यशाळेत डॉ.चंद्रमौली जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून गणित समजावून सांगितले. नैसर्गिक संख्या, सम व विषम संख्यांची बेरीज, जादुई चौरस, ‘टच अॅण्ड अन्सर’ यांसारख्या विविध संकल्पना हसत-खेळत कशा शिकता येतात, याचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांसमोर करून दाखविले. या अभिनव पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणिताचा आनंद घेतला. सूत्रसंचालन गजाला बासीत यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

