खंडवा-भुसावळ-मनमाड रेल्वे मार्गाची महाव्यवस्थापकांकडून पाहणी


भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी भुसावळ विभागातील खंडवा-भुसावळ-मनमाड रेल्वे मार्गाची विंडो ट्रेलिंगद्वारे पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅक, रेल्वे मालमत्ता, पायाभूत सुविधा तसेच परिचालन आणि सुरक्षिततेशी संबंधित व्यवस्थांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान खंडवा, बुरहानपूर, भुसावळ आणि मनमाड स्थानकांवरील उपलब्ध प्रवासी सुविधा व पायाभूत सुविधांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी स्थानकांची स्वच्छता, प्रवासी सुविधांची उपलब्धता व गुणवत्ता, रेल्वे ट्रॅकची स्थिती, सिग्नल व दूरसंचार (एस अ‍ॅण्ड टी) व्यवस्था, लेव्हल क्रॉसिंग तसेच लहान पुलांच्या स्थितीकडे विशेष लक्ष देण्यात आले.

पायाभूत सुविधांचा आढावा
महाव्यवस्थापकांनी खंडवा, बर्‍हाणपूर आणि मनमाड स्थानकांच्या पाहणीदरम्यान प्रवासी सुविधा, स्वच्छता व्यवस्था, स्थानक परिसर, पायाभूत सुविधा तसेच सुरक्षा व संरक्षा व्यवस्थांचा आढावा घेतला. भुसावळ विभागात सुरू असलेल्या विविध बांधकाम कामांबाबत तसेच रेल्वे परिचालन क्षमता वाढविण्यासाठी मोबिलिटी प्लॅनिंगशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. महाव्यवस्थापकांनी भुसावळ येथील पाहणीदरम्यान मेमू कार शेडच्या कार्यप्रणाली, देखभाल व्यवस्थेची तसेच उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. स्वच्छता पंधरवड्याच्या अंतर्गत यांत्रिक विभागाद्वारे आयोजित ‘कचर्‍यापासून कलाकृती’ प्रदर्शनाचेही त्यांनी अवलोकन केले. या प्रदर्शनात अनुपयोगी व टाकाऊ साहित्याचा सर्जनशील पुनर्वापर करून तयार करण्यात आलेल्या विविध कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.

भुसावळात रनिंग स्टाफसाठी सुविधांचा आढावा
महाव्यवस्थापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, टाकाऊ साहित्याचा सर्जनशील पुनर्वापर हा स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धन आणि संसाधनांच्या प्रभावी वापराबाबत जनजागृती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. महाव्यवस्थापकांनी लोको रनिंग रूमची पाहणी करून लोको पायलट आणि रनिंग स्टाफसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. खंडवा ते मनमाड रेल्वे मार्गाच्या पाहणीदरम्यान महाव्यवस्थापकांनी रेल्वे मार्गाची संरक्षा, रेल्वे मालमत्तेची देखभाल तसेच प्रवासी सुविधांची गुणवत्ता यावर विशेष भर दिला आणि संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक निर्देश दिले. पाहणीदरम्यान भुसावळ डीआरएम पुनीत अग्रवाल यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !